Mumbai News – सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची धावत्या लोकलमधून उडी, पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने लोकलमधून उडी घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या लोकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन लाइन्स आणि चर्नी रोड स्थानकांदरम्यान महिलेने सोमवारी सकाळी धावत्या लोकल ट्रेनमधून उडी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, दिशा चौहान असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांच्या माहितीनुसार, चर्नी रोड स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच या महिलेने ट्रेनमधून उडी घेतली.

याप्रकरणी मयत दिशाची आई रेखा चौहान यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पती जिग्नेश वालसुर आणि त्याच्या आई-वडिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 108 अन्वये आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये दिशाचा जिग्नेशसोबत विवाह झाला. विवाहानंतर जिग्नेशकडून दिशाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. जिग्नेश वारंवार दिशाला मारहाण करत असे आणि पैशांची मागणी करत असे. मुलीचा छळ थांबावा म्हणून रेखा चौहान या वारंवार जावयाला आर्थिक मदत करत होत्या. रेखा या जावयाला महिन्याचा खर्च आणि इतर अतिरिक्त खर्चासाठी पैसे पुरवत होत्या. मात्र तरीही मुलीचा छळ थांबत नव्हता.

एफआयआर (FIR) नुसार, छळाला कंटाळून दिशाने यापूर्वीही एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारानंतर ती बरी झाली. यापूर्वी पतीविरुद्ध एक अजामीनपात्र तक्रार (NC) देखील दाखल करण्यात आली होती. सासरच्या मंडळींनी मुलीच्या छळ करण्यासाठी तिच्या पतीला साथ दिल्याचा आरोप रेखा यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.