
रविवारी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यात ते जखमीही झाले आहेत. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण बॅनर्जी निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची तक्रार देण्यासाठी चंडीतळा पोलीस ठाण्यात जात होते, त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. हा आपल्याला मारून टाकण्याचा प्रयत्न होता, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले. या घटनेची माहिती मिळताच ममता बॅनर्जींनी तातडीने त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली.
दुसरीकडे तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही शनिवारी हल्ला झाला. ते दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सोनारपूर येथे हिंसाचारग्रस्त कुटुंबांना भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर विटा, दगड आणि अंडी फेकण्यात आली. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. यानंतर आज कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.



























































