
कर्जत येथील बालनिरीक्षण गृहातून एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुलगा स्वतः पळून गेला की कुणी त्याला पळवून नेले, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
३१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संबंधित मुलगा बाथरूमला गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. विशेष म्हणजे बाथरूमच्या खिडकीची लोखंडी ग्रील तुटून आणि खाली पडलेली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या संस्थेतच सुरक्षा व्यवस्था भेदून मुलगा बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धर लागली आहे.































































