
आखातील युद्धामुळे एकीकडे इंधनाच्या किमतीत वाढ झाली असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर साठेबाजी सुरू असल्याचे पुढे आले आहे. इंधनाच्या घाऊक विक्री केंद्रापेक्षा (तेल कंपन्यांचे डेपो) पेट्रोल पंपावर दर कमी आहेत. त्यामुळे औद्योगिक व घाऊक व्यापारी हे पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणि डिझेलची मोठ्या प्रमाणावरून खरेदी करीत आहेत. परिणामी सामान्य ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होत नसल्याची कबुलीच राज्य सरकारने दिली आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीतील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने पावले उचलली आहेत. त्यासाठी सरकारने हालचाली सुरू करताच साठेबाजीचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये घाऊक औद्योगिक ग्राहक हे तेल कंपन्यांच्या डेपोऐवजी किरकोळ पेट्रोल व डिझेल विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणावर डिझेलची खरेदी केल्याच्या घटना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आल्या. घाऊक पेट्रोल आणि डिझेल विक्रीचे दर हे किरकोळ पेट्रोल व डिझेल विक्रीच्या दरापेक्षा जास्त आहेत. परिणामी घाऊक व औद्योगिक व्यापारी हे किरकोळ विक्री पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलची खरेदी करीत आहेत. त्यामुळे किरकोळ ग्राहकांसाठी
उपलब्ध असलेल्या उपलब्ध इंधन साठ्यावर ताण येत असल्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने मान्य केले आहे.
गतवर्षीपेक्षा मे महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या मागणीत वाढ
तेल उद्योग विभागाकडील आकडेवारीनुसार मागील वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत या वर्षी पेट्रोलच्या मागणीत १८.५४ टक्के आणि डिझेलच्या मागणीत २३.३ टक्के वाढ झाली आहे, तर बल्क डिझेलच्या म्हणजे घाऊक डिझेलच्या खरेदीत घट झाली आहे. याचा अर्थ पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणावर व्यापारी डिझेलची खरेदी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपावरील इंधनाच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत.
तेल कंपन्यांकडूनच खरेदी करा
घाऊक ग्राहकांना पेट्रोल व डिझेलची आवश्यकता असल्यास त्यांनी तेल वितरण कंपन्यांच्या थेट विक्री आणि घाऊक विक्री यंत्रणेकडून इंधनाची खरेदी करावी. पेट्रोल पंपावरून खरेदी केल्यास कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.



























































