मला तोंड उघडायला लावू नका! सुप्रिया सुळे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार कसा झालाय ते आम्हालाही माहीत आहे आणि तुम्हालाही, मला तोंड उघडायला लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावरून सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडी नसून माघार आघाडी असल्याची टीका केली जात आहे. याबाबत प्रश्न पत्रकारांनी प्रश्न केला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये. मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये. माझा तो स्वभावदेखील नाही. मात्र, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या विरोधात ताकदीने लढू. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत जो काही घोडेबाजार झाला आहे, तो घोडेबाजार कसा झाला? याबाबत बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत’, असे सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले.

निवडणूक पद्धतीत सुधारणा आवश्यक – फडणवीस

निवडणूक पद्धतीमध्ये निश्चितच सुधारणा आणि बदल होण्याची आवश्यकता आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुळेंच्या या भूमिकेचे अप्रत्यक्षपणे स्वागत केले. तसेच अशा प्रकारच्या सुधारणांचे विधेयक कोणीही आणल्यास त्याला आपला पाठिंबा असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संसदेत बिल सादर करणार

कोणत्याही निवडणुकीत होणारे घोडेबाजार बंद झाले पाहिजेत, त्यामुळे मी आता लवकरच संसदेत एक विधेयक मांडणार आहे. कोणतीही निवडणूक फक्त पैशांच्या जिवावर कोणीही लढू नये. तसेच कोणीही सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सची भीतीदेखील दाखवू नये’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.