
शितपेयातून गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार करणारा शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्या अंतरिम जामिनावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. साहिलला न्यायालयाने दिलेल्या दोन दिवसांच्या अंतरिम जामिनाची मुदत काल बुधवारी संपली. मात्र, वेळापूर न्यायालयाने त्याच्या अंतरिम जामिनाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. या खटल्याची पुढील सुनावणी आता येत्या मंगळवारी होणार आहे.
तळवली येथे राहणाऱ्या विवाहित तरुणीवर साहिल चौगुले याने बलात्कार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. तिच्या पतीला साहिलच्या गुंडांनी मारहाण करून नवी मुंबईतून पळवून लावले आहे. त्यामुळे या विवाहितेचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. काही दिवसांपूर्वी साहिलने या विवाहितेवर वाशी येथील एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वेळापूर न्यायालयाने साहिलला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
त्या जामिनाची मुदत संपल्यानंतर काल बुधवारी पुन्हा न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणाची सुनावणी आता येत्या १६ जून रोजी होणार असून त्याच दिवशी साहिलचा अंतरिम जामीन वाढवला जाऊ शकतो की रद्द होतो हे स्पष्ट होणार आहे.
रबाळे पोलिसांची आरोपीला मदत
शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी रबाळे पोलिस त्याला मदत करत आहेत, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संपर्क प्रमुख अवधेश शुक्ला यांनी केला आहे. या पीडित तरुणीला न्याय देण्याऐवजी रबाळे पोलिस तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.



























































