
एसटी महामंडळाचा आणखी एक जीवघेणा आणि भोंगळ कारभार रविवारी रात्री संगमेश्वर आगारामध्ये पुढे आला आहे. देवरुख आगाराच्या एका लांब पल्ल्याच्या बसच्या बॅटरीचा संगमेश्वर आगारातच रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रचंड मोठा, कानठळ्या बसवणारा आवाज झाला. या आवाजाने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. महामंडळाच्या या निकृष्ट दर्जाच्या देखभालीमुळे आणि संगमेश्वर स्थानकातील तांत्रिक बेजबाबदार व्यवस्थेचा प्रवाशांना फटका बसत आहे.
देवरुख आगाराची देवडे ते बोरिवली जाणारी गाडी आगारात उभी होती. अचानक या गाडीतून प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजाने घाबरलेले प्रवासी एसटी बसमधून बाहेर पडू लागले. बसच्या बॅटरी कक्षातून प्रचंड धूर आणि रासायनिक पाणी बाहेर फेकले जात असल्याचे दिसून आले.
स्फोट झाला तेव्हा बसचे चालक आणि वाहक नियंत्रण कक्षात नोंद करण्यासाठी गेले होते. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जीवाची पर्वा न करता तात्काळ बॅटरीचा कक्ष उघडला आणि मुख्य सप्लाय कीट बाहेर काढलं. यामुळे पुढील भीषण संभाव्य घटना टळली. स्फोटात बॅटरीच्या भागाचे तुकडे झाले.
शासनाने या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्ज आणि भव्य बस स्थानक इमारत तर उभारली आहे. मात्र गाड्यांची तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी येथे एकही कायमस्वरूपी मेकॅनिक नाही. संगमेश्वर स्थानकात किंवा महामार्गावर जवळपास एखाद्या गाडीत बिघाड झाला, तर चालक-वाहकाला देवरुख आगाराशी संपर्क साधावा लागतो. तिथे माहिती मिळाल्यानंतर देवरुखवरून मेकॅनिक आणि साहित्य संगमेश्वरला पाठवले जाते.
बॅटरी स्फोटानंतर देवरुख आगाराला चालक-वाहकाने माहिती दिल्यानंतर तिथून दुसरी बॅटरी आणि मेकॅनिक येईपर्यंत तास ते दीड तास प्रवाशांना रात्रीच्या वेळी ताटकळत राहावे लागले. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मनस्ताप शेकडो प्रवाशांना सहन करावा लागतो. संगमेश्वर आगार आवारात 24 तास कायमस्वरूपी मेकॅनिक आणि आवश्यक तांत्रिक साहित्याची उपलब्धता असावी, अशी रास्त मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी वर्ग आणि जनतेकडून गेली अनेक वर्षे सातत्याने केली जात आहे. एसटी महामंडळाने आतातरी संगमेश्वर स्थानकात तातडीने कायमस्वरूपी मेकॅनिकची नियुक्ती करावी, अन्यथा महामंडळाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक इशारा येथील जनतेने दिला आहे.




























































