
अन्न आणि औषधी प्रशासनाचे ‘साहेब येणार’ असा ‘मेसेज’ येताच बुलढाणा जिल्ह्यातील मोठी अशी ओळख असलेल्या डोणगावच्या बाजारपेठेत अक्षरशः लॉकडाऊन लागला. किराणा दुकाने, हॉटेल्स, टपरीचालक, औषधी दुकानदार, पाणीपुरीवाले, फळविक्रेते, मिठाईवाले असे सगळेच आपापली दुकाने बंद करून पळून गेले!
मेहकर तालुक्यातील डोणगावची बाजारपेठ ही जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेपैकी एक. सकाळी नेहमीप्रमाणे बाजारात चहलपहल सुरू झाली. अचानक काही व्यापाऱयांच्या व्हॉट्स ऍपवर ‘साहेब येणार आहेत’ असा मेसेज आला. क्षणार्धात अन्न आणि औषधी प्रशासनाचे पथक येणार असल्याची अफवा बाजारात पसरली. क्षणार्धात किराणा दुकान, हॉटेल्स, टपरीचालक, औषधी दुकानदार, पाणीपुरीवाले, फळविक्रेते, मिठाईवाले अगदी चहावालाही आपले दुकान बंद करून पळाला. ‘साहेब’ तर काही आले नाहीत, पण ते येणार या अफवेनेही अख्ख्या बाजारपेठेला दरदरून घाम फुटला. ‘साहेब’ आलेच नव्हते मग बाजारपेठ बंद का झाली हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला.
‘विमल’ भेटेना, पोट साफ होईना; सरकारने आमचा विमा काढावा
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. पान टपऱ्यांवरून गुटखा गायब झाला आहे. गुटखा विक्रेत्यांमध्ये दहशत आहेच, पण गुटखा खाणारेही कासावीस झाले आहेत. एका तरुणाने तर सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून अजब मागणी केली आहे. तुकाराम मुंढे यांच्यामुळे विमलची पुडी भेटेना, पोट साफ होईना, त्यामुळे सरकारने आमचा विमा काढावा असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.




























































