
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी समाजकंटकांनी पुन्हा एकदा दिली आहे. धमकीचा पहिला मेल बुधवारी आल्यानंतर गुरुवारी सायंकाळीही अशाच प्रकारचा आणखी एक धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.४३ वाजता सीआयएसएफच्या (CISF) मुंबई कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनलवर लवकरच केमिकल वेपर बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने नाक व तोंड झाकून विमानतळ परिसरातून बाहेर पडावे, असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ई-मेल आयडी आणि मोबाईलधारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.






























































