
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीस यांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात जिलेटिन, डिटोनेटर्स यांसारख्या स्फोटकांचा मोठा साठा आणि वाहने मिळून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायणी-विटा रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली.
विशाल लक्ष्मण जाट (वय 39, सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. रायपूर, जि. भिलवाडा, राजस्थान), बारूलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. राजस्थान), मालक व पुरवठादार शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी, ता. खटाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
सातारा जिह्यात स्फोटक पदार्थांची बेकायदा वाहतूक, तसेच साठा करणाऱ्यांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीसप्रमुख निखिल पिंगळे व अपर अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी गुन्हे शाखेचे अजित कर्णे, प्रवीण पवार, स्वप्नील दौंड, अमित सपकाळ यांचे पथक तयार केले होते.
मायणी-विटा रस्त्यालगतच्या गरवारेवस्ती येथे दोन इसम दोन बोलेरो गाडय़ांमधून जिलेटिन व इतर स्फोटक पदार्थांची बेकायदा विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने वडूज पोलिसांच्या मदतीने छापा टाकून वाहने जप्त केली. या वाहनांत खाकी बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये जिलेटिन कांडय़ांचे नऊ बॉक्स (1800 नग), विविध प्रकारचे डेटोनेटर्स (त्यामध्ये इलेक्ट्रिक, नॉन इलेक्ट्रिक, ऑर्डिनरी डेटोनेटर्स) व सेफ्टी फ्यूज, तसेच दोन बोलेरो, टेम्पो असा 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार चव्हाण, काळेल, महिला अंमलदार चव्हाण यांनीही कारवाईत सहभाग घेतला.

























































