FIFA World Cup 2026 – गोल… आणि इतिहास घडला! दक्षिण आफ्रिकेला नमवत कॅनडा प्रथमच अंतिम 16 संघांमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहयजमान कॅनडाने फिफा वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचत प्रथमच स्पर्धेतील बाद फेरीचा सामना जिंकला. अखेरच्या क्षणी झालेल्या निर्णायक गोलच्या जोरावर कॅनडाने दक्षिण  आफ्रिकेवर 1-0 अशी निसटती मात करत अंतिम 16 संघांमध्ये धडक मारली. आता 4 जुलैला कॅनडाचा सामना नेदरलँड्स आणि मोरोक्को यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या लढतीत नियोजित 90 मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. दोन्ही बाजूंनी आक्रमणांची मालिका सुरू असतानाही बचावफळीने भक्कम खेळ केला. मात्र, इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटाला ऑलिस्टेअर जॉन्स्टनने अचूक चेंडू पुढे सरकवत स्टीफन युस्टाक्वियोला सुवर्णसंधी निर्माण करून दिली आणि त्याने चेंडू जाळ्यात धाडत कॅनडाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. जॉन्स्टनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. कॅनडाने या ऐतिहासिक विजयासह जगाला आपल्या फुटबॉल सामर्थ्याची झलक दाखवून दिली असून, आता अंतिम 16 संघांमध्येही हीच विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ह्युगो ब्रूस यांनी या सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. वयाच्या 74 वर्षे 79 दिवसांत त्यांनी विश्वचषकाच्या बाद फेरीत संघाला मार्गदर्शन करत सर्वात ज्येष्ठ प्रशिक्षक होण्याचा मान मिळवला. त्यांनी ऑस्कर तबारेझ यांचा 2018 मधील विक्रम मागे टाकला.

तुम्ही देशाचे नायक जेसी मार्श

ऐतिहासिक विजयाने भारावलेले कॅनडाचे मुख्य प्रशिक्षक जेसी मार्श भावुक झाले. सामन्यानंतर त्यांनी खेळाडूंचे मैदानातच कौतुक करत, तुम्ही आता संपूर्ण देशाचे नायक आहात. तुमच्या या कामगिरीमुळे कॅनडातील फुटबॉलच्या नव्या पिढीला प्रेरणा मिळेल,’ असे गौरवोद्गार काढले.

अल्फोन्सो डेव्हिसच्या पुनरागमनाने मिळाले बळ

कॅनडाचा स्टार बचावपटू अल्फोन्सो डेव्हिस दुखापतीतून सावरत 75व्या मिनिटाला मैदानात उतरला. त्याच्या आगमनानंतर कॅनडाच्या आक्रमणाला नवी धार मिळाली. त्याने प्रॉमिस डेव्हिडसाठी गोलची सुवर्णसंधी निर्माण केली. मात्र, त्याचे गोलमध्ये रूपांतर झाले नाही. अखेर इंज्युरी टाईममध्ये युस्टाक्वियोने निर्णायक गोल झळकवत
कॅनडाला अतिरिक्त वेळेचा धोका टाळून विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेची झुंज व्यर्थ

दक्षिण  आफ्रिकेने संपूर्ण सामन्यात भक्कम बचाव करत कॅनडाला बराच वेळ रोखून धरले. गोलरक्षक रॉनवेन विल्यम्स यांनी तब्बल पाच अप्रतिम बचाव करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले. मात्र, अखेरच्या क्षणी झालेल्या गोलपुढे त्यांचाही निभाव लागला नाही आणि दक्षिण  आफ्रिकेचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.