
स्टार स्ट्रायकर एार्लिंग हालांडने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर नॉर्वेने आयव्हरी कोस्टवर 2-1 अशी थरारक मात करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ‘राऊंड ऑफ 16’मध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 86 व्या मिनिटाला हालांडने स्पर्धेतील वैयक्तिक पाचवा गोल झळकावत आयव्हरी कोस्टच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. आता रविवारी न्यूयॉर्कमध्ये नॉर्वेसमोर बलाढय़ ब्राझीलचे आव्हान असेल.
सामन्याच्या सुरुवातीला आयव्हरी कोस्टने आक्रमक खेळ करत नॉर्वेच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. निकोलस पेपे आणि घिस्लेन कोनान यांनी गोलच्या संधी निर्माण केल्या, मात्र त्यांना यश मिळाले नाही. नॉर्वेने 39 व्या मिनिटाला आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली. कर्णधार मार्टिन ओडेगार्डच्या अचूक पासवर अँटोनियो नुसा याने अप्रतिम वळणदार फटका मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला.
दुसऱ्या सत्रात आयव्हरी कोस्टने जोरदार पुनरागमन केले. बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अमाद डियालोने पेपेसोबत सुरेख चाली रचत शानदार गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत आणला.
सामना अनिर्णित राहण्याची चिन्हे असतानाच 86 व्या मिनिटाला हालांडने आपला करिष्मा दाखवला. ऑस्कर बॉब आणि पॅट्रिक बर्ग यांच्या उत्कृष्ट समन्वयानंतर मिळालेल्या चेंडूवर त्याने रिकाम्या गोलपोस्टमध्ये सहज गोल करत नॉर्वेचा विजय निश्चित केला.
अतिरिक्त वेळेत अमाद डियालोची धोकादायक फ्री किक गोलरक्षक ऑर्जन नायलंडने अडवत नॉर्वेचा विजय कायम राखला. या विजयानंतर नॉर्वेचा आत्मविश्वास उंचावला असून आता ‘राऊंड ऑफ 16’मध्ये ब्राझीलविरुद्ध त्यांची खरी कसोटी लागणार आहे.



























































