तारापूर एमआयडीसीतील केमेट इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट, दोन कामगार गंभीर जखमी; दोन किलोमीटरपर्यंत हादरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तारापूर एमआयडीसी परिसरातील केमेट इंडस्ट्रीज या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. रिअॅक्टर फुटल्याने झालेल्या स्फोटात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका तीव्र होता की दोन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. यामुळे परिसरातील अनेक उद्योगांसह निवासी भागांमध्येही घबराट उडाली.

बोईसर येथील तारापूर एमआयडीसीत प्लॉट क्रमांक एन – ७४/१ येथे केमेट इंडस्ट्रीज आहे. बुधवारी कारखान्यात रासायनिक उत्पादन सुरू असताना अचानक रिअॅक्टरचा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या दोन कामगारांना त्वरित बाहेर काढून उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय करण्यात आले असून रिअॅक्टरमध्ये स्फोट होण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार रासायनिक प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी अधिकत कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

कामगारांचा जीव धोक्यात
तारापूर एमआयडीसीमध्ये गेल्या काही वर्षांत रासायनिक उद्योगांमध्ये आग, स्फोट आणि गॅस गळतीसारख्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असल्याने कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक कारखान्यांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन, यंत्रसामग्रीची नियमित देखभाल, आपत्कालीन यंत्रणा आणि सुरक्षा प्रशिक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून कामगारांच्या जीवाला धोका आहे.

ऑडिटची मागणी
स्फोटानंतर कामगार संघटनांकडून केमेट इंडस्ट्रीजमधील सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच तारापूर एमआयडीसीतील सर्व धोकादायक रासायनिक उद्योगांचे सुरक्षा ऑडिट करून निष्काळजीपणा करणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.