
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दापोली शहराला अगदी लागूनच असलेल्या मौजे दापोली या गावात गेल्या ५ दिवसांपासून वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. वीज नसल्यामुळे गावातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे बंद पडली असून, रॉकेलही मिळत नसल्याने नागरिकांना रात्री अंधारात काढाव्या लागत आहेत. या समस्येने त्रस्त झालेल्या मौजे दापोलीतील महिलांनी महिला मंडळ अध्यक्षा संजना संतोष भुवड यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर दापोली येथील महावितरण कार्यालय गाठले. वीज खंडित झाल्याने होणारा त्रास सांगण्यासाठी आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काही मदत हवी असल्यास ती करण्याची तयारी दर्शवण्यासाठी भारती म्हसकर, आरती म्हसकर, सुलभा बुरटे, गीता गावडे, अर्चना म्हसकर आदी महिला कार्यालयात पोहोचल्या. मात्र, त्यांची कैफियत ऐकून घेण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात हजर नसल्याने महिलांना बराच वेळ वाट पाहून शेवटी निराश होऊन माघारी फिरावे लागले.
महावितरणच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज बिल भरण्यास थोडा जरी विलंब झाला, तरी कोणतीही दयामाया न दाखवता तातडीने वीज कनेक्शन कापणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाच दिवस वीज खंडित असताना आपली जबाबदारी का जाणवत नाही, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. सर्वांकडेच इन्व्हर्टरची सोय नसल्याने सामान्य ग्रामस्थांचे हाल होत आहेत. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे गावकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई महावितरण कंपनी देणार का? असा खडा सवाल आता मौजे दापोलीकरांकडून विचारला जात असून, त्वरित वीज पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.




























































