
हिंदुस्थानचा टी-20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव झाला आहे. मंगळवारी नॉटिंघम येथे झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडने हिंदुस्थानचा 125 धावांनी पराभव केला. गतविजेत्या हिंदुस्थानला 202 धावांचा पाठलाग करताना फक्त 76 धावा करता आल्या. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारे स्टार खेळाडू इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे सपशेल अपयशी ठरले.
England tick all the boxes in a big win at Trent Bridge 👏
Scorecard 📲 https://t.co/4aDRVnYwd6 pic.twitter.com/m6xjyGw2id
— ICC (@ICC) July 7, 2026
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 202 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची त्रेधातिरपीट उडाली. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी अनुक्रमे 10 आणि 13 धावा काढून माघारी परतले. त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यरही बाद झाले. त्यानंतर आलेला अक्षर पटेलही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे पॉवरप्लेमध्येच हिंदुस्थानने पाच विकेट्स गमावल्या. पाचव्या षटकापर्यंत हिंदुस्थानची अवस्था 5 बाद 52 अशी बिकट होती.
इंग्लंडचे वेगवान गोलंदाज आग ओकत होते. या वेगवान माऱ्यापुढे हिंदुस्थानचे शेवटचे पाच खेळाडूही फक्त 23 धावा काढून बाद झाले. शेवटच्या पाचही खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. अखेर 11.4 षटकांमध्ये हिंदुस्थानचा संघ 76 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून जोश टंगने सर्वाधिक 4, तर जोफ्रा आर्चरने 3 विकेट्स घेतल्या. आदिल रशिद याने 2 आणि विल जॅक्सने 1 विकेट घेतली.






























































