ट्रम्प यांनी डिवचल्यानंतर इराण पुन्हा पेटला, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील दोन जहाजांवर डागले मिसाईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंतिम प्रवास शनिवार 4 जुलैपासून सुरू झाला असून 9 जुलै रोजी इराणच्या मशहाद शहरात इमाम रेझा यांच्या दर्ग्याजवळ संपूर्ण शासकीय इतमामात खामेनी यांचा दफनविधी पार पडेल. खामेनी यांच्या अंत्यसंस्कारावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डिवचले होते. ”आम्ही खूप दयाळू आहोत, म्हणून इराणला खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी आठवडाभराची सुट्टी दिली आहे” असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे इराण पेटला असून त्यांनी होमुर्झच्या सामुद्रधुनीतील दोन जहाजांवर मिसाईल डागले.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या दोन व्यावसायिक जहाजांवर दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देत ‘एक्सिओस’ ने हे वृत्त दिले आहे. या हल्ल्यात दोन्ही जहाजांचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्यांमुळे अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या सामंजस्य करारावर (MoU) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या करारांतर्गत इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील हल्ले थांबवण्याचे मान्य केले होते. तसेच, कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये झालेली एक आठवड्याची युद्धबंदी नुकतीच संपली असून, त्यानंतर लगेचच हा हल्ला झाला आहे.

ओमानच्या किनारपट्टीवर आणखी एका टँकरला आग

या हल्ल्यानंतर लगेचच मंगळवारी पहाटे ओमानच्या किनारपट्टीजवळून जाणाऱ्या एका तेलवाहू टँकरवर अज्ञात क्षेपणास्त्राने हल्ला केला. यामुळे टँकरला भीषण आग लागली. ब्रिटिश लष्कराच्या ‘युनायटेड किंगडम मेरीटाईम ट्रेड ऑपरेशन्स’ (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ओमानच्या आखाताकडे जात असताना त्याच्या डाव्या बाजूला (Port Side) हा फटका बसला.