
नेरूळ येथील एलपी जंक्शन येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दोन तरुणींना विजेचा जोरदार धक्का बसल्यानंतरही नवी मुंबई महापालिका कुंभकर्णी झोपेतून जागी झालेली नाही. या दुर्घटनेचा ठपका ठेवून कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना निलंबित करण्यात आले तरी शहरात उघड्या डीपी आणि रस्त्यावर आलेल्या भूमिगत केबल तशाच आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरील या केबलचे आवरणही फाटलेले आहे. भय इथले संपत नाही, अशी परिस्थिती नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये निर्माण झाली आहे.
पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे शुभांगी वालखंडे आणि उज्ज्वला वाघ या दोन तरुणींना विजेचा जोरदार धक्का बसला. दोघींना तातडीने डी. वाय. पाटील रुग्णालयात आणि नंतर मनपाने फोर्टिज रुग्णालयात दाखल केले. या रस्त्यावर भूमिगत वायर उघड्यावर आली होती. वाहने त्यावरून गेल्याने वायरवरील रबरी आवरण निघाले होते. या गंभीर घटनेची दखल घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांना निलंबित केले.
महापालिका आयुक्तांच्या धडक कारवाईनंतर शहरातील उघड्या डीपी, रस्त्यावर आलेल्या भूमिगत केबल, या दुरुस्त होणे अपेक्षित होते. मात्र ही घटना घडून पाच दिवस झाले तरी अनेक ठिकाणी उघड्या डीपी आणि दरवाजा तुटलेले फ्यूज बॉक्स, खांबावरून छोटे बॉक्स उघडे दिसून येत आहेत.
तुर्भे पोलीस ठाण्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. याच ठिकाणी जमिनीलगत फ्यूज बॉक्स उघड्या अवस्थेत आढळून आला होता. सुदैवाने अपघात घडला नाही. अशाच पद्धतीने शहरात अनेक ठिकाणी डीपी आणि फ्यूज बॉक्स उघडे असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तातडीने दुरुस्ती करण्यात यावी
नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी डीपी उघड्या आहेत. भूमिगत केबल रस्त्यावर आल्या असून त्यांच्यावरील आवरणही निघालेले आहे. डीपींची आणि फ्यूज बॉक्सची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि रस्त्यावर आलेल्या केबल पुन्हा भूमिगत करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.





























































