
डोंबिवली स्थानकालगत असलेल्या कैलास लस्सी स्वीट मार्टचे किचन आज सकाळी पेटले. आग लागताच किचनमध्ये काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत खिडकीतून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
डोंबिवली पूर्वेतील कैलास लस्सी स्वीट मार्टच्या पहिल्या मजल्यावरील किचनमध्ये अचानक आगीचा भडका उडाला. आग लागली तेव्हा किचनमध्ये आठ कामगार काम करत होते. त्यांनी खिडकीतून उड्या मारत बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आग लागल्याचे समजताच डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
कैलास लस्सी हे दुकान रेल्वे मार्गालगत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. कर्मचाऱ्यांची खिडकीतून जीव वाचवण्यासाठी सुरू असलेली धावपळ या व्हिडीओमध्ये कैद झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.





























































