देणगी चोरीविरोधात काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह; नाशिकच्या काळाराम मंदिरातून आज सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरातील देणगीचा पैसा लुटणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. शिवसेनेने टाकलेली ती ठिणगी आता राज्यभरात पसरणार आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावर आंदोलनाची घोषणा आज केली. ७ जुलैपासून काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला जाणार आहे. त्याची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली जाणार आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराला रामभक्तांनी लाखो-करोडो रुपये दान स्वरूपात दिले, सोन्या-चांदीचे दागिने दिले. त्या दानावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बगलबच्च्यांनी दरोडा टाकला. कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवर टाकलेला हा दरोडा आहे. श्रीरामाला लुटणाऱ्या भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांना कठोर शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी हा सत्याग्रह केला जाणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात सकाळी ११ वाजता सपकाळ यांच्या उपस्थितीत आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष नीलेश ऊर्फ बबलू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ९ जुलै ते १४ जुलै दरम्यान राज्यभरात सर्व जिल्ह्यांत राम मंदिर, शिव मंदिर अथवा हनुमान मंदिरात हा सत्याग्रह केला जाणार आहे. “मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या भाजपा आणि आरएसएसच्या लबाड लोकांना सुबुद्धी दे,” अशी प्रार्थना या वेळी देवाकडे केली जाणार आहे.