
चेंबूर येथे झाड पडून झालेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर साकीनाका येथील मॅनहोलमध्ये पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनेप्रकरणी अभियंते, सहाय्यक उद्यान अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्त यांना निलंबित करण्यात आले आहेत. याविरोधात आज कामगार संघटनांनी महापालिका प्रशासनाविरोधात भर पावसात जोरदार निदर्शने केली. चौकशी पूर्ण होईपर्यंत अभियंता-अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्या, अन्यथा कामबंद करणार अशा इशारा कामगार संघटनांनी दिला.
दोन्ही घटनांची कारणे काय आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोणत्याही अभियंत्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा काहीही संबंध नसताना राजकीय दबावापोटी, विनाचौकशी अभियंते व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे, असा आरोप कामगारांनी केला. या विरोधात सर्व अभियंते, अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, कामगार-कर्मचारी यांनी उपायुक्त (परिमंडळ 5), एम/पश्चिम विभाग, चेंबूर यांच्या कार्यालयासमोर जमून तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, उपाध्यक्ष . जीवन पाटील, विशाल कोकाडे, राजेश जोशी, किरन जकापुरे, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष, कार्याध्यक्ष यशवंत धुरी, म्युनिसिपल कामगार सेनेचे संजय कांबळे-बापेरकर, दि म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस रमाकांत बने आणि म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केले.
यावेळी महापालिका उपायुक्त (परि. 5) संध्या नांदेडकर यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना भेटून अभियंते, अधिकारी यांचे चुकीच्या पद्धतीने केलेले निलंबन त्वरित मागे घ्यावे असे सांगण्यात आले. आयुक्तांनी चौकशीचा अहवाल येईपर्यंत पुढील कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे सध्या तरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. परंतु जर अधिकारी आणि अभियंते यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय झाला तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनच्या नवनाथ घाडगे, अशोक जाधव व वामन कविस्कर यांनी दिला.





























































