रायगडात हाहाकार! अंबा, कुंडलिका, उल्हास, सावित्री नद्यांना पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या चार दिवसांपासून सलग धुवांधार सुरू असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार उडाला. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, उल्हास, सावित्री नद्यांना पूर आला. त्यामुळे नागोठणे, रोहा, महाड, कर्जत बाजारपेठांना पुराचा वेढा पडला. अष्टविनायकापैकी एक असलेले पाली शहर पाण्याखाली गेले. गणेशमूर्तीची पंढरी असलेल्या पेणमध्ये गणपती कारखाने पुरात बुडाले. वरंध आणि कशेडी घाटात दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि रायगड-पुण्याला जोडणारा संपर्क तुटला. ताम्हिणी घाटातील रस्त्या खचला. रायगडातील अनेक अंतर्गत गार्वामधील वाहतूक पुरामुळे बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या. पनवेलमध्ये नदीत पोहताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दोन तरुण वाहून गेले. दरम्यान मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवल्याने जिल्हा प्रशासन ऑनड्युटी चोवीस तास अलर्ट मोडवर आहे.

९७३ नागरिकांचे स्थलांतर

रायगड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. ठिकठिकाणी दरती कोसळत आहेत. यामुळे आज दिवसभरात १४ गावांच्या २६५ कुटुंबातील ९३७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.

नदीत पोहताना दोन तरुण वाहून गेले

पनवेलच्या घोधाणी परिसरात वाघाची वाडी येथील नदी पात्रात पोहण्यासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले. नथन म्हात्रे व सुमित पवार अशी त्यांची नावे आहेत. दोघेही विचुंबे गावातील रहिवासी होते.

बल्लाळेश्वर मंदिरात पाणी शिरले

पाली येथील बल्लाळेश्वर मंदिरात पाणी शिरल्याची घटना घडली. मंदिराच्या पूर्व दिशेला असलेला ओढा ढगफुटीसदृश पाऊस पडल्यामुळे पूर्णपणे ओसंडून बाहू लागला आहे. रविवारी रात्री उशिरा मंदिरात चिखलयुक्त पाणी शिरल्याने पुजारी, कर्मचारी, गणेशभक्त यांची एकच तारांबळ उडाली.

विघ्नहर्त्यावर ‘पूर संकट’

पेण चार दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे पेणमधील ‘विघ्नहत्या’ वरच ‘पूर संकट’ कोसळले आहे. ढगफुटीसदृश अतिवृष्टी झाल्याने पुराचे पाणी पेण तालुक्यातील गणपतीच्या कारखान्यांमध्ये शिरले. असंख्य मूर्ती पाण्यात बुडाल्या असून अन्य साहित्यदेखील भिजले आहे. या संकटामुळे मूर्तिकार कारखानदारांचे लाखो रुपयांचे नुकररान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून कारखानदारांना भरपाई द्यावी, अशी मागणी गणेश मूर्तिकार संघटनेचे माजी अध्यक्ष जयेश पाटील यांनी केली आहे. पेण तालुक्यातील तांबडशेत, जोहे, हमरापूर, कळवे, उर्णाली, सोनखार, सापोली या विभागांत सुमारे ६०० गणेश मूर्ती कारखाने आहेत. त्यापैकी सुमारे १५० कारखान्यांना या पूर परिस्थितीचा फटका बसला आहे. कच्च्या मूर्तीसह रंगवलेल्या मूर्तीही भिजल्या आहेत. १ फुटापासून ते १० फुटांपर्यंतच्या शाडू मातीच्या तसेच पीओपीच्या गणेशमूर्ती या पावसाच्या पाण्यात असल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच साचा, काथा, रबर, रंग, शाडू माती, पीओपी व इतर साहित्यही पुरामध्ये भिजले आहे.

७३ घरांच्या जवळ दरडी कोसळल्या

जिल्ह्यात २५ ठिकाणी दगड-माती खाली येण्याच्या तर ७३ घरांच्या परिसरात दरड कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनांमध्ये तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रस्त्यांबर आलेल्या दरडी आणि दगड-माती तातडीने हटवून बाहतूक पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी तत्परतेने कार्यवाही केली आहे. दरडप्रवण भागातील कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

रानसई धरण ओव्हरफ्लो

सलग पडत असलेल्या पावसामुळे रानसई धरण मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले, त्यामुळे उरणकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणाची साठवण क्षमता दहा दशलक्ष घनमीटर एवढी आहे.

पळसदरी ते खोपोली रेल्वे बंद

पळसदरीच्या ठाकूरवाडी येथे दरड कोसळून दोन कार व दोन दुचाकी मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या. पहाटे अडीच वाजता कोसळलेल्या दरतीमुळे रेल्वे ट्रैक खचला असून पळसदरी ते खोपोली रेल्वे बंद पडली.

२४२ घरांमध्ये पाणी

२४२ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. सात गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. रोहा तालुक्यातील बाळसई येथील एका मंदिराचे, महाड तालुक्यातील बिन्हेरे सुतारकोंड येथील एका शाळेचे तसेच १२ खासगी दुकानांचे नुकसान झाल्याची नोंद आहे