
मुसळधार पावसाने पालघर जिल्ह्याला झोडपून काढल्याने वसई, नालासोपारा, पालघर, केळवा आणि डहाणू परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १३० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. केळवा बंधाऱ्याला तडे गेल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक संथ झाली तर वसई-विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली. अनेक इमारतींना पाण्याचा वेढा पडला. तर अनेक चाळी आणि तळ मजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा फटका बसला.
डहाणू, केळव्यात अलर्ट
डहाणू आणि केळवा परिसरातही मुसळधार पावसाने नदी, नाले धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत. केळवे बंधाऱ्याला तडे गेल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने परिसरातील नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलवले.
बंदी आदेश असतानाही वाड्यातील सावरोली पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक
सावरोली पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक करू नये असे स्पष्ट बंदी आदेश असतानाही या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. पावसाळ्यात हा पूल अधिकच धोकादायक झालल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २९ जून रोजी या पुलावरून वाहतूक करण्यास मनाई केली होती.
वसईला सर्वाधिक तडाखा; भिंत कोसळून १५ वाहने दबली
वसई पूर्व आणि पश्चिमेतील अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. तुळींज, आचोळे, सेंट्रल पार्क, अलायन्स हॉस्पिटल रोडसह अनेक परिसरात इमारतींच्या तळ मजल्यांमध्ये पाणी शिरले. बचाव पथकाने बोटींच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले असून आतापर्यंत २०० हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. एका सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली पंधरा दुचाकी दबल्या गेल्या. मात्र सुदैवाने त्या भिंतीजवळ कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भिंत कोसळून महिला ठार
पालघर शहरासह केळवे, सफाळे, माहीम-कोळगाव, सरावली आणि आसपासच्या सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यात घरात साचलेले पाणी बाहेर काढत असताना घराची भिंत कोसळून ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटनांमुळे प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.






























































