
सारसोळे येथील अनाधिकृत बांधकामावरील कारवाई थांबवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना पाठवण्यात आलेली न्यायालयाची बोगस स्टे ऑर्डर ही सभागृह नेते सागर नाईक यांच्या मोबाईलवरून पाठवण्यात आलेली आहे, असा आरोप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी करून नाईक यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदे असा वादाचा भडका पुन्हा उडाला आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत सुरू झालेले गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद दिवसेंदिवस शिगेला पोहोचत चालला आहे.
सारसोळे येथील अनधिकृत बांधकामाला महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाईची नोटीस पाठवली होती. मात्र या कारवाईला बेलापूर न्यायालयाने स्थगिती दिल्याची ऑर्डर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना व्हॉट्सॲप करण्यात आली. चौकशीअंती ही ऑर्डर बोगस असल्याचे आढळून आले. आयुक्तांना ऑर्डर ज्या मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात आली तो क्रमांक नवी मुंबई पालिकेतील सभागृह नेते सागर नाईक यांच्या नावावर आहे, असा आरोप शिंदे गटाचे किशोर पाटकर यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असल्यामुळे सागर नाईक यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी पाटकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली आहे.
* बोगस स्टे ऑर्डरचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बेलापूर न्यायालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. न्यायालयाने केलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* बोगस स्टे引 ऑर्डरचा घोटाळा उघड झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सारसोळे गावातील संबंधित इमारतीवर कारवाई केली आहे. अशा अनेक बोगस स्टे ऑर्डर विविध विभाग कार्यालयांमध्ये असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
* बोगस स्टे ऑर्डरप्रकरणी सभागृह नेते सागर नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.





























































