
विरोधकांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वस्तुस्थिती स्पष्ट केली. ‘सध्या निसर्गाच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या सरासरी ८०० घटना घडतात, पण रविवारी एकाच दिवशी ३५० झाडे कोसळली, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. आजचा दिवस त्याहूनही गंभीर आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग ७० ते ९० किलोमीटर प्रतितास होणार असल्याने आम्ही सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची विनंती केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मानखुर्दमध्ये रविवारी रात्री कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती शेजारच्या झोपडीवर कोसळल्याने त्यातील लोकांचा मृत्यू झाला, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई-पुणे रस्ता आहे त्यावर दरड कोसळली आहे. निसर्गाचे चक्र बदलल्याने हे घडतेय. प्रशासनाने तयारी केली त्यापेक्षा विपरीत घटना घडत आहेत. महापालिका आपात्कालीन विभाग व सर्व यंत्रणा रस्त्यावर आहेत. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली तेव्हा तातडीने रस्ता बंद करून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली.
दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना आधीच सूचना दिल्या गेल्याने तिथे लोक अडकल्याची परिस्थिती नाही. पण रस्त्यावर पाणी इतके साठले आहे की मदत करून गाड्या बाहेर काढाव्या लागत आहेत. दोन तीन दिवसांत झालेल्या घटना आणि त्या पुन्हा होऊ नये म्हणून केलेली कारवाई यासंदर्भात उद्या सभागृहात संपूर्ण आकडेवारीसह निवेदन करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवेदनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याची घोषणा केली. अतिवृष्टीची परिस्थिती कुणाच्याही हातात नसते, पण सर्वांचे सहकार्य असेल तर ती प्रभावीपणे हाताळली जाऊ शकते. शासनाला सर्वांनी याकामी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी सध्या पर्यटनाला जाऊ नये
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अतिवृष्टीच्या काळात पत्रे उडून जाण्याचा किंवा झाडे पडण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नका. विशेषतः तरुण मंडळींनी वादळी वातावरणात पर्यटन स्थळांवर जाणे टाळावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.





























































