
भाजप-शिंदे सरकारच्या सत्तेत दररोज एकसे बढकर एक भ्रष्टाचार समोर येत असताना आता ‘रमाई आवास योजने’त सदनिका बळकावण्यासाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बोगस टॅक्स पावती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने रेशन कार्ड काढल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत घडलेल्या या गंभीर प्रकरणाचा मंगळवारी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत भंडाफो़ड केला.
विधान परिषदेत ‘93च्या सूचने’अंतर्गत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी हा प्रश्न मांडताना छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘रमाई आवास योजने’त घरे घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच या योजनेत भाजप नगरसेविकेचा मुलगाही लाभार्थी असून या घोटाळ्यात भाजपच्या एका आमदाराचाही समावेश असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. विशेष म्हणजे सरकारनेही या घोटाळ्याची कबुली दिली आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करणार
– शिवसेनेने उघड केलेल्या घोटाळ्याच्या प्रश्नावर उत्तर देताना समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 मे 2025 रोजी जुनी प्रक्रिया रद्द करून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. त्यामध्ये 8,442 अर्ज प्राप्त झाले. पडताळणीसाठी बोलाविल्यानंतर केवळ 2,913 अर्जदार उपस्थित राहिले, तर सुमारे 5,500 अर्जदार अनुपस्थित राहिले. या प्रकरणाच्या विभागीय आयुक्तांमार्फत समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल. या घोटाळ्यात दोषी आढळणाऱयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.




























































