पहिल्याच पावसात ‘हायटेक’ पुणे मेट्रोची पोलखोल; स्वारगेट, गरवारे, कल्याणीनगर स्थानकांत गळती, फ्लॅटफॉर्मवर बादल्या ठेवल्या, प्रवासी संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठा गाजावाजा करत आणि कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या पुणे मेट्रोच्या स्थानकांची पहिल्याच मुसळधार पावसात पोलखोल झाली आहे. सर्वात गजबजलेले भूमिगत स्थानक असलेल्या स्वारगेट येथे मोठी गळती लागली. तसेच गरवारे कॉलेज, कल्याणीनगर मेट्रो स्थानकांमध्येही छतातून पाणीगळती झाली. प्लॅटफॉर्मवर आणि प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर पाणीगळती लागल्याने महामेट्रो प्रशासनाला बादल्या ठेवण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, ‘हायटेक’ मेट्रोच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी मेट्रो स्थानकांमध्ये ळती झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः स्वारगेट या मिगत स्थानकात छतातून पाणी थेट प्लॅटफॉर्मवर आणि वाशांच्या मार्गावर झिरपत असल्याचे दिसून आले. पाणी माचल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन संबंधित काणी प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब ठेवण्यात नाले. तसेच प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या.

स्वारगेट हे पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचे सार्वजनिक वाहतूक केंद्र आहे. नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या या भूमिगत स्थानकासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बांधकाम आणि आधुनिक सुविधा यांचा दावा महामेट्रोकडून करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच दमदार पावसात स्थानकाच्या छताला गळती लागल्याने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गरवारे कॉलेज आणि कल्याणीनगर स्थानकांमध्येही छताच्या विविध भागांतून पाणी झिरपत असल्याचे प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रवाशांना सावधपणे मार्गक्रमण करावे लागले. गळतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महामेट्रोवर टीकेची झोड उठली आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या आधुनिक मेट्रो स्थानकांना पहिल्याच पावसात गळती लागणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकल्पांच्या बांधकामाची गुणवत्ता नेमकी कशी तपासली जाते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामेट्रोकडून संबंधित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात गळती रोखण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या या प्रकारामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टीकेचा वर्षाव

स्वारगेट, गरवारे कॉलेज आणि कल्याणीनगर स्थानकांतील गळतीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. ‘हायटेक मेट्रोत बादल्यांचा आधार’, ‘कोट्यवधींचा प्रकल्प आणि पहिल्याच पावसात गळती’ अशा प्रतिक्रिया देत नागरिकांनी महामेट्रोवर टीका केली. अनेकांनी या संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.