
कोकणातील कातळशिल्पे म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे आहेत. कातळशिल्पांना धक्का लावून विकास प्रकल्प उभारले जाणार नाहीत, अशी ग्वाही सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन कातळशिल्पावरील चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते, नाना पटोले यांनी भाग घेतला. कातळशिल्पे असलेल्या कोकणातील बारसू व अन्य भागांमध्ये विकासाच्या नावाखाली विनाशक प्रकल्प आणले जाणार आहेत, मग कातळशिल्पांचे अस्तित्व कायम राहील का, असा प्रश्न केला.
कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील त्या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल. पुरातत्व खाते आणि राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रकल्प कातळशिल्पांजवळ होणार नाही. तसेच या कातळशिल्पांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, असे उत्तर आशीष शेलार यांनी दिले.





























































