
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी अविनाश शुक्ला याने देणगी चोरीच्या रकमेतील सुमारे 19 लाख रुपये मित्रांवर उधळले, प्रेयसीला आयफोन भेट म्हणून दिला. त्याने भावाच्या लग्नावरदेखील सहा लाख रुपये खर्च केले. आता अविनाश शुक्लाने केलेल्या या व्यवहारांची तसेच त्याची बँक खाती आणि संपत्तीचा तपास सुरू करण्यात येत आहे.
देणगी चोरीप्रकरणी अविनाश शुल्कासह आठ जणांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अविनाश शुक्लावर दानपेटीतील रक्कम मोजणी कक्षापर्यंत नेणे आणि मोजणीचे काम होते. तो यातील मोठी रक्कम चोरायचा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाशने मित्र आणि कुटुंबीयांवर देणगी चोरीतील 19 लाख रुपये उधळले. भावाच्या लग्नावर त्याने सहा लाख रुपये खर्च केले. दुसऱ्या भावावर पाच-सहा लाख रुपये दिले. प्रेयसीला आयफोन भेट दिला. याशिवाय तिला 2.5 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. चोरीच्या रकमेतून त्याने अयोध्येच्या आसपास मालमत्तादेखील खरेदी केल्या आहेत. आता त्याने खरेदी केलेल्या सर्व मालमत्तेची तसेच बँक खात्यांची माहिती तपासण्यात येत आहे.
ट्रान्सफर केलेले पैसे वसूल करणार
अविनाशने 3.5 लाख रुपये देऊन एक एसयूव्हीदेखील खरेदी केली. ही गाडी आधीच जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्याने अनेक लोकांना लहानमोठय़ा रकमा ट्रान्सफर केल्या हात्या. पोलिसांनी त्याच्या दोन्ही भावांची चौकशी करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याने भाऊ अभिषेक याच्या नावाने वर्ष 2024 मध्ये खरेदी केलेली जमीन आणि संबंधित बँक खात्याची चौकशी सुरू केली आहे. अविनाशने ज्या लोकांना पैसे ट्रान्सफर केले त्यांच्याकडून ती वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
20 लाख रोख, डॉलर आणि दागिने जप्त
अविनाशकडून आतापर्यंत 20.39 लाख रुपये रोख, 1,121 अमेरिकन डॉलर, सोने-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या घरातून ‘रामराज्य कोश’ लिहिलेली एक पेटी जप्त करण्यात आली आहे. त्यावर पेटीएम क्यूआर असून मंदिराशी संबंधित अनेक कागदपत्रेदेखील सापडली होती.






























































