ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी ’हनी’ जोमाने फिल्डवर उतरणार; लाईव्ह कॉन्सर्ट, पार्ट्यांवर करडी नजर राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशिष बनसोडे 

लाईव्ह कॉन्सर्टचे कार्यक्रम, पाटर्य़ांमध्ये लपूनछपून ड्रग्जचा शिरकाव होऊ नये, कोणी प्रयत्न केलाच तर ड्रग्ज तस्करांना वेळीच रोखण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने कंबर कसली आहे. सराईत ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी आता ‘हनी’ या श्वानाला फिल्डवर उतरविण्यात येणार आहे.

ड्रग्स विरोधात धडक कारवाया करणाऱया अंमली पदार्थ विरोधी कक्षाने आणखी ताकदीने कारवाई करण्याचा निर्धार केला आहे. ड्रग्ज तस्करांना रंगेहाथ पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतु ड्रग्ज तस्कर वेगवेगळ्या शकला लढवत वेगवेगळ्या मार्गाने एमडी, गांजा, हायड्रो गांजा, कोकेन, एलएसडी, हेरॉईन आदी पार्टी ड्रग्जची तस्करी करतात. त्यामुळे लपूनछपून ड्रग्जची तस्करी करणाऱयांना शोधून काढणे बऱयाचदा जिकिरीचे बनते. खबर असेल तर कारवाई करता येते अन्यथा तस्कर पकडला जात नाही.

अशा सराईत व सफाईदारपणे ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पकडण्याकरिता विशेष प्रशिक्षित असलेल्या ‘हनी’ या नार्कोटिक्सच्या श्वानाला फिल्डवर उतरविण्यात येणार आहे. लपवून नेला जात असलेला अमली पदार्थ शोधून काढण्यासाठी हनीची मदत घेतली जाणार आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष ड्रग्ज विरोधात धडक कारवाया करत आहेतच. पण ‘हनी’ या श्वानाचा देखील ड्रग्ज तस्करांना पकडण्यासाठी आणखी प्रभावीपणे वापर करणार आहोत. लवकरच त्याचे रिझल्ट दिसतील.

पौर्णिमा चौगुले, उपायुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष)