
कोल्हापूर जिल्ह्यात आजही पावसाचे धुमशान सुरूच राहिले. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, पंचगंगा नदीत गेल्या चोवीस तासांत दोन फुटांची वाढ झाली.सायंकाळी सातच्या सुमारास 35 फूट 11 इंचावर स्थिर असलेली पंचगंगा नदी 39 फुटांच्या इशारा पातळीपासून केवळ तीन फूट दूर होती. जिल्ह्यात 59 बंधारे पाण्याखाली गेले असून, अतिवृष्टीमुळे तीन राज्यमार्ग, चार प्रमुख जिल्हा मार्ग, सात जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग आणि दोन इतर जिल्हा मार्ग असे एकूण 22 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (दि. 8) कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राधानगरी अर्धे भरले
कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शाहुकालीन 8.36 टीएमसी क्षमतेचे राधानगरी धरण अखेर पन्नास टक्के भरले. धरणात 52.33 टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय तुळशी 50.47 टक्के, वारणा 49.1 आणि दूधगंगा धरणात 23.77 टक्के पाणीसाठा आहे.
एसटीच्या 600 फेऱ्या रद्द
पावसाचा राज्य परिवहन महामंडळाला फटका बसला असून, मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेससह कोल्हापूर जिल्ह्यातील 600 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. जिल्ह्यात चार राज्य मार्गावर सध्या रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने, ते बंद झाले आहेत. तर प्रमुख जिल्हा व इतरही मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आल्याने त्या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत एसटीला 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती कोल्हापूर विभागाच्या वाहतूक नियंत्रक वृषाली भोसले यांनी दिली आहे. जिल्ह्यातील बारा एसटी डेपो पैकी अतिदुर्गम भागातील चंदगड आणि गडहिंग्लज या एसटी डेपोला सर्वाधिक फटका बसला.
अणुस्करा-राजापूर राज्यमार्ग बंद…
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारभोगाव ते पोहाळे या मार्गावर कासारी नदीच्या पुराचे पाणी आल्याने, कोल्हापूर-बाजारभोगाव अणुस्करा-राजापूर हा राज्यमार्ग बंद झाला. तर घटप्रभा नदीवर तारेवाडी बंधारा आणि तुळशी नदीवरील बाचणी बंधारा पाण्याखाली गेला आहे.
गगनबावड्यात सर्वाधिक 88 मि.मी. पावसाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 47.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगले 24.9, शिरोळ 17.7, पन्हाळा 57.6, शाहुवाडी 44.2, राधानगरी 69.7, करवीर 46, कागल 34.5, गडहिंग्लज 44.6, भुदरगड 58, आजरा 66.1 आणि चंदगड तालुक्यात 70.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.




























































