
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, वाई तालुक्यातील जांभळी खोरे अतिवृष्टीने हादरून गेले आहे. गेल्या 24 तासांत जांभळी परिसरात तब्बल 550 मि.मी. पावसाची नोंद झाली. नदी, नाले आणि ओढय़ांना आलेल्या पुराने शेती, रस्ते, पूल वाहून जनजीवन अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतीवरील सुपीक माती वाहून गेली असून, काही ठिकाणी शेतांमध्ये आता केवळ दगड, गोटे आणि खडकच शिल्लक राहिल्याचे विदारक चित्र आहे.
अतिवृष्टीमुळे जांभळी गाव आणि आदिवासी पाड्यांना जोडणारे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. रस्त्यांवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा आणि दळणवळण व्यवस्थेवरही परिणाम झाल्याने ग्रामस्थांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाईच्या तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी स्वतः पुराच्या पाण्यातून मार्ग काढत बाधित भागाची पाहणी केली. त्यांनी जांभळी परिसरातील आदिवासी पाड्यावर जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. पोलीस पाटील, सरपंच यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य धोका लक्षात घेऊन आदिवासी पाड्यातील कुटुंबांना गावातील शाळा आणि मंदिरात स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदारांच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडत शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली जनावरे, तुटलेले रस्ते आणि संपर्क व्यवस्था याबाबत प्रशासनासमोर हकिकत मांडली.
विशेष म्हणजे, गेल्यावर्षीही याच जांभळी खाऱ्यात अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. त्या जखमा अजून भरून निघालेल्या नसतानाच यंदाही निसर्गाने पुन्हा एकदा तडाखा दिला आहे. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी या भागातून होत आहे.
शेतकरी संकटात
लहान-मोठे ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने पुराच्या पाण्याने शेतात उभ्या असलेल्या पिकांसह मातीही वाहून नेली. काही अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीनच पुराच्या प्रवाहात कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीच नव्हे, तर जनावरेही पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.
सात जनावरे वाहून गेली
जांभळी खोऱ्यात पावसाचा कहर अधिक आहे. जांभळी येथील धनगर आणि कोळी वस्तीला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. या पावसात पारटवस्ती येथील लक्ष्मण मारुती चोरगे यांची सात दुभती जनावरे पुरात वाहून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुग्धव्यवसायावर अवलंबून असलेल्या चोरगे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी शेती खरडून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.



























































