
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनक्षेत्रात जहाल विषप्रयोगामुळे खवल्या मांजर, दोन गर्भवती भेकर, रानगवे आणि दोन माकडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी उपस्थित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या चौराकुंड हे १५,२७० हेक्टर क्षेत्रावर विस्तारित आहे. या वनपरिक्षेत्रात गाभा क्षेत्रात १ गाव आणि बफर क्षेत्रात ६ गावे आहेत. या चौराकुंड परिक्षेत्रात मे महिन्यात उत्तर अंजनझडप उत्तर मालुर क्षेत्रात ३ रानगवे, दोन भेकर (गर्भवती), दोन माकडे, गवा आणि खवले मांजराचा जहाल विषप्रयोग करून मृत्यू झाल्याची बाब खरी असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
या प्रकरणी क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी आदेश दिले आहेत. या प्रकरणात वनकर्मचारी, वन्यजीव काईम सेल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती आणि डॉग स्कॉड परतवाडाच्या कोंबिंग ऑपरेशन राबवून तपासणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली. शिवसेना आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रस्तावित अभयारण्यांच्या उभारणीत आवश्यक स्टाफ भरणार का, असा प्रश्न उपस्थित केला.




























































