
बांगलादेशातील ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे नव्याने स्थापन झालेल्या नॅशनल सिटिझन पार्टीच्या (एनसीपी) रॅलीत सोमवारी रात्री एक भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात तीनजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या रॅलीचे आयोजन केले होते.
एनसीपीने सोमवारी रात्री जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, सावर पोलीस स्टेशन स्टँडजवळील ईदगाह मैदानावर रात्री सुमारे 9.45 वाजता पक्षाची सभा सुरू असताना दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला. हा स्फोट ‘जुलै मार्च’च्या पहिल्याच दिवशी झाला आहे. सार्वमत, रोजगार निर्मिती, वीज संकटावर तोडगा, भाव नियंत्रण आणि सीमा सुरक्षा अशा विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेख हसीना यांच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलनाच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त जुलै महिन्यात देशव्यापी मोर्चे काढण्याची घोषणा एनसीपीने यापूर्वीच केली होती.

























































