
पती-पत्नीमधील वादात एका निष्पाप बाळाचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडण सुरू असताना मध्ये आलेल्या 11 महिन्यांच्या पोटच्या मुलीला झोपडीबाहेर फेकूल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आवलाहल्ली पोलिसांनी 22 वर्षीय ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे. घटना घडल्याच्या जवळपास एका महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणातील आरोपी आई सध्या फरार आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्य़ा वृत्तानुसार सेकप्पा असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वडिलांचे नाव असून, त्याची पत्नी विजयलक्ष्मी फरार आहे. सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
बंगळुरूच्या बिदराहल्ली होबळी येथील किथागनूर गावात 9 जून रोजी दुपारी 2 ते 3 च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. आरोपी सेकप्पा आणि विजयलक्ष्मी यांना दोन मुले आहेत. मात्र, विजयलक्ष्मीचे शेजारी राहणाऱ्या नागप्पा नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. याशिवाय विजयलक्ष्मीचे तिच्या दुसऱ्या मुलीवर अजिबात प्रेम नव्हते.
9 जून रोजी दुपारी सेकप्पा घरी आला आणि त्याने पत्नीकडे जेवण मागितले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. आई-वडिलांचे भांडण पाहून 11 महिन्यांची चिमुरडी रडू लागली. याचा राग येऊन विजयलक्ष्मीने चिमुरडीला लाथ मारली. पत्नीचे हे कृत्य पाहून सेकप्पाचा पारा चढला आणि त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमधील हा वाद इतका विकोपाला गेला की, सेकप्पाने रागाच्या भरात रडणाऱ्या मुलीला उचलले आणि थेट झोपडीबाहेर फेकून दिले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचा मृत्यू झाला.
पोलीस कारवाईतून वाचण्यासाठी आरोपी सेकप्पाने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मुलगी खाटेवरून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने रचला होता. मात्र, 22 जून रोजी पोलिसांना मिळालेल्या शवविच्छेदन अहवालात ही घटना उघकीस आली. चिमुरडीचा मृत्यू खाटेवरून पडल्याने नाही, तर अतिरक्तस्राव आणि श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे समोर आले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेकप्पा आणि विजयलक्ष्मीने रागाच्या भरात चिमुरडीला लाथ मारली आणि जमिनीवर जोरात फेकून दिले. असे केल्याने बाळाचा मृत्यू होऊ शकतो, हे माहीत असूनही त्यांनी हे कृत्य केले. तपासामध्ये या चिमुरडीची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती सेकप्पाला बेड्या ठोकल्या असून, त्याची पत्नी विजयलक्ष्मी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.


























































