
मुंबईनंतर आता राजधानी नवी दिल्लीत पावासाचा कहर सुरू आहे. राजधानी दिल्लीत अखेर मान्सून दाखल झाला असून काही भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह एनसीआरच्या अनेक भागांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने (IMD) दुपारनंतर संपूर्ण दिल्लीत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दिल्ली आणि गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हाहाकार माजला आहे. ईस्ट ऑफ कैलासमध्ये वाहनांवर झाड कोसळले. दिल्लीपासून गुरुग्रामपर्यंत अनेक भागांमध्ये काळे ढग दाटले असून सोसाट्याचा वारा सुरू आहे. हवामान विभागाने (IMD) दिल्लीला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यादरम्यान दिल्लीच्या ईस्ट ऑफ कैलास परिसरात अनेक वाहनांवर एक मोठे झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
हवामानातील बदलामुळे दमट उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. सकाळपासून दिल्ली-एनसीआरच्या आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. दिल्ली ते गुरुग्रामकडे वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे तापमानही खाली आले आहे. दिल्लीच्या अमर कॉलनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईस्ट ऑफ कैलास परिसरात जोरदार वाऱ्यामुळे वाहनांवर एक मोठे झाड कोसळले. या घटनेत किमान ४-५ वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मुसळधार पावसामुळे गुरुग्राममधील हिरो होंडा चौक ते सुभाष चौक या रस्त्यावर वाहतूक मंदावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज (मंगळवार), ७ जुलै रोजी दिल्लीतील तापमान ३०-३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) २ जुलै रोजी दिल्लीत मॉन्सूनच्या आगमनाची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी दिल्लीत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा अपेक्षित आहे. वाऱ्याचा वेग ताशी ३०-५० किलोमीटर किंवा त्याहून अधिक असू शकतो.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २-३ दिवसांत मॉन्सून देशाच्या उर्वरित भागांमध्ये, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये आणखी पुढे सरकेल. यानंतर, मॉन्सून देशभरात सक्रिय होईल.



























































