वय वर्षे 116 अन् उत्साह तरुणांसारखा! तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आजींची पायी तिरुमला यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते. तसेच श्रद्धा असेल तर कोणत्याही अडचणींवर मात करता येते, हे कर्नाटकातील 116 वर्षांच्या आजींनी दाखवून दिले आहे. कर्नाटकातील ११६ वर्षांच्या नवनीतम्मा यांनी भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी तिरुमला पर्वतावरची यात्रा पूर्ण केली. वयाच्या ११६ व्या वर्षी केलेल्या त्यांच्या यात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लोक त्यांच्या धैर्याला, भक्तीला आणि दृढनिश्चयाला सलाम करत आहेत.

नवाणीतम्मा आपल्या कुटुंबासह तिरुमला येथे पोहोचल्या आणि भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठीची यात्रा पूर्ण केली. दरवर्षी लाखो भाविक तिरुमला येथे यात्रा करतात. मात्र, वयाच्या ११६ व्या वर्षी ही खडतर यात्रा पूर्ण करणे हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे त्यांची ही यात्रा भाविकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

नवनीतम्मा यांची अढळ भक्तीमुळे तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) सोमवारी सकाळी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एका विशेष व्हीआयपी दर्शनाचे आयोजन केले. त्यामुळे त्यांना कोणत्याही गैरसोयीशिवाय भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेता आले.

नवनीतम्मा यांच्या भेटीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनाही प्रभावित केले. त्यांनी एक्सवर त्यांची प्रशंसा केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी नवनीतम्मा यांच्या भक्तीची आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्याची प्रशंसा केली. नवनीतम्मा यांच्या प्रवासाचा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे, तर जीवनातील दृढनिश्चय आणि सकारात्मक विचारांचेही उदाहरण आहे.