कचऱ्यापासून बनवलेल्या हायड्रोजन इंधनावर दिल्लीच्या बस धावणार; नितीन गडकरी यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात E20 पेट्रोलवरील वाद अजून शमला नसतानाच आता कचऱ्यापासून इंधन बनवण्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या ई२० इंधनाचा इंजिनवर होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यातच आता सरकार भविष्यातील इंधनाची एक नवीन संकल्पना मांडत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत नवा दावा केला आहे. त्यामुळे या चर्चेला नवीन वळण मिळाले आहे. भविष्यात दिल्लीच्या बस पेट्रोल, डिझेल किंवा विजेवर नाही, तर शहरातील कचऱ्यापासून तयार केलेल्या हायड्रोजनवर धावतील, असा दावा त्यांनी केला आहे.

एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी म्हणाले, गेल्या ५० वर्षांत माझे भाकीत कधीही चुकलेले नाही. भविष्यात, दिल्लीच्या बस शहरातील कचऱ्यापासून बनवलेल्या हायड्रोजनवर धावू शकतील. यामुळे केवळ प्रदूषणच कमी होणार नाही, तर स्थानिक उत्पन्नही वाढेल. त्यामुळे आज मोठी समस्या असलेल्या कचऱ्यापासून इंधन तयार होणार आहे.

नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी म्हणाले, भविष्यात दिल्लीच्या बस शहरातील कचऱ्यापासून तयार केलेल्या हायड्रोजनवर धावू शकतील. महानगरपालिकेच्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याचा वापर केला, तर त्यातून हायड्रोजन तयार करता येईल. त्याचा उपयोग बस चालवण्यासाठी केला जाईल. हे स्वप्न किंवा केवळ एक कल्पना नसून, ते पूर्णपणे शक्य आहे, असे गडकरी म्हणाले.

महापालिकेच्या कचऱ्याचे सर्वप्रथम वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन वायू तयार केला जाईल. भविष्यात दिल्लीतील बस याच हायड्रोजनवर धावतील. जग वेगाने अशा इंधनाकडे वाटचाल करत आहे, जिथे वाहनांना ऊर्जा देण्यासाठी पाण्यापासून हायड्रोजन तयार करता येईल, असे ते म्हणाले.

हे सर्व कसे घडेल, असा प्रश्न लोक अनेकदा विचारतात. गेल्या ५० वर्षांत आपले प्रत्येक भाकीत खरे ठरले आहे. त्यामुळे, कचऱ्यापासून बनवलेल्या हायड्रोजनवर बस चालवण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील कचराभूमींमधील (लँडफिल साइट्स) अंदाजे ८० लाख टन कचरा द्रुतगती मार्गाच्या बांधकामात आधीच वापरण्यात आला आहे. २०२७ पर्यंत देशभरातील कचऱ्याचे मोठे ढिगारे नाहीसे करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठी कचऱ्याचा संसाधन म्हणून वापर करण्यावर भर दिला जात आहे.

कचरा केवळ एक समस्या नाही, तर तो उत्पन्नाचा एक मोठा स्रोतही असू शकतो. त्यांनी आपल्या मतदारसंघातील महानगरपालिकेचे उदाहरण दिले. जी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या विक्रीतून वार्षिक अंदाजे ३२५ कोटी रुपये कमावते. जर कचरा आणि सांडपाण्याचा योग्य वापर केला, तर त्याचा पर्यावरणाला फायदा होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्नही वाढेल, असे ते म्हणाले.