
यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. १५ जणांच्या टीममध्ये संघात सॅमसनच्या नावाचा समावेश नसल्याने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत मैन सोडत त्याला वगळण्याचे कारण स्पष्ट केले आहे. संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आलेले नाही, तर त्याला विश्रांती देण्यात आली आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे. आगामी व्यस्त वेळापत्रक आणि आशियाई खेळ लक्षात घेऊन त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. संघात तीन सलामीवीर आहेत. प्रभसिमरन सिंग, अभिषेक शर्मा आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी. तथापि, संघातून संजू सॅमसनच्या अनुपस्थितीने त्याच्या चाहत्यांना आश्चर्य वाटले. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळण्याची संजू सॅमसनची शक्यता खूपच कमी होती. त्यामुळे, त्याला संघात घेण्याऐवजी, त्याला विश्रांती देऊन तरुण खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सूत्रांनी सांगितले, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजूला विश्रांती दिल्याबद्दल इतके आश्चर्य का वाटत आहे? या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना हे माहित असले पाहिजे की सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संजू भारतीय संघाचा भाग आहे. निवड समितीवर टीका करणाऱ्यांनी थोडा अभ्यास करायला हवा. संजू खेळणारच नसेल तर त्याला संघात घेण्याचा काय अर्थ आहे? तो एक वरिष्ठ खेळाडू आहे.
अलीकडच्या सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे संजू सॅमसनला संघातून वगळण्याच्या चर्चांना जोर आला आहे. आयर्लंड दौऱ्यावर त्याने ० आणि ५ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात त्याने फक्त एक धाव काढली. सलग तीन खराब खेळींनंतर, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली.
आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात संजू सॅमसनचे नाव समाविष्ट नसल्याने, निवड समितीने त्याला वगळले असावे असा समज झाला होता. संजू सॅमसनची अलीकडील कामगिरी अस्थिर राहिली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत, तो पाच सामन्यांमध्ये केवळ ४६ धावा करू शकला होता. त्यानंतर त्याने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात जोरदार पुनरागमन केले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
संजू सॅमसनने स्पर्धेच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये ९७ नाबाद, ८९ आणि ८९ धावांच्या शानदार खेळी केल्या. या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणूनही गौरविण्यात आले. त्यानंतर, आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२६ मध्ये, सॅमसनने १४ सामन्यांमध्ये ४७७ धावा केल्या. मात्र, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या संघातील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आता बीसीसीआयने याबाबत स्पष्टीकरण देत त्याला विश्रांती देण्यात आल्याचे सांगितले.

























































