
विठोबा भाजपच्या ताब्यात गेला तर शिवसेनेला दानपेटीचे संरक्षण करावे लागेल, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच पैसे खाण्याचे निर्लज्ज समर्थन करणारा हा भारतीय जनता पक्ष असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, या देशामध्ये दोन लोकांचं बिंग फुटलेले आहे. एक विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. 6 हजार 700 कोटी रुपये काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन, दलाली मिळाली ती वाहून नाही गेली. त्यातून भाजपला निधी मिळाला पण सरकारचे साधारण साडे सहा हजार कोटी वाहून गेले. ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या, त्याचा बोजवारा कसा उडाला हे आपण गेल्या काही वर्षात आपण पाहिलं. ज्या पद्धतीने मुंबई, पुणे ही मोठी शहरं भाजपच्या ताब्यात आहेत, पावसात या शहरांची वाताहत झाली, पावसात हे इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, किती तकलादू पद्धतीने ठेकेदाराने कामं केली, आणि ठेकेदारांकडून फक्त दलाली आणि पैसे घेतले, हे या पावसाने उघड केले आहे. 25 वर्ष जनतेने आम्हाला सत्ता दिली, जसे भाजपने राम मंदिरातून पैसे चोरले तशी आम्ही सत्ता नाही चोरली. लोकांनी आम्हाला सत्ता दिली आणि आम्ही लोकांना सेवा दिली. पण पालिकेत भाजपचं सरकार आल्यापासून प्रत्येक ठिकाणी ओरबाडणं सुरू आहे. आता लोकांना नाशिकच्या कुंभमेळ्याची भिती वाटते. त्याची जबाबदारी इन्फ्रा मॅनचे राईट हँड गिरीश महाजनांवर जबाबदारी आहे. जे या महाराष्ट्रातले सर्वात भ्रष्ट मंत्री आहेत. ते संकट मोचन नसून संकट लोचन आहेत. त्यांनी डोळा उघडलं तर संकट येतं. तर आता कुंभ मेळ्यात किती भ्रष्टाचार होईल. देशभरातून लाखो लोक तिथे येतील. सगळे ठेके गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याने अजिबात कामं होणार नाहीत. फक्त यांना कमिशन मिळणार आहे. हे प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. ज्या पद्धतीने मिसिंग लिंक कोसळताना, जगाने पाहिला. कारण यांचं काम जागतिक स्तरावर असतं. सहा प्रमुख देशांच्या सहकार्यातून मिसिंग लिंक तयार झाला. त्या लिंकवरून इन्फ्रा मॅन आणि डेप्युटी इन्फ्रा मॅन वाहन चालवत फिरत होते. हे इन्फ्रास्ट्रक्चर कोसळताना आम्ही पाहिलंय. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी अप्रतिष्ठा आणि बेअब्रू झाली त्याचे शेवटचे टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळणे. ते म्हणतात की यांनी एक तरी पूल उभारला का? मुंबईत 56 फ्लायओव्हर आम्ही बांधले. मुख्यमंत्री महाशय 1995 साली शिवसेना भाजप युतीचे सरकार असताना मुंबई पुणे एक्स्प्रेसवे पासून ते 56पूल, विदर्भातले रस्ते हे त्या काळातच झाले. तेव्हा हे देवेंद्र फडणवीस आमदार होते. त्यामुळे विकास काय असतो हे आम्हाला सांगू नका. फ्रीवे हा आमच्या काळातच सुरू झाला. या अटल सेतूला तुम्ही वाजपेयींचे नाव दिले त्याचे काम काँग्रेसच्या काळात सुरु झाले. आणि तुम्ही केलेली कामं ही महिन्याभरातच कोसळली आहेत. मेट्रो गळतेय, लोकल ट्रेन गळत आहे, बेस्टच्या बस गळत आहेत. त्याचे कारण यांनी प्रत्येक ठिकाणी पैसे खाल्ले आहेत. प्रत्येक ठिकाणी आधी कमिशन घ्यायचं. अंबरनाथचा भाजपचा नगराध्यक्ष म्हणतो की पैसे खाल्ले पाहिजे म्हणून. म्हणजे पैसे खाण्याचे निर्लज्ज समर्थन करणारा हा पक्ष आहे. ज्यांनी राम मंदिराचे पैसे खाल्ले, ज्यांनी सीतामाईचे मंगळसूत्र चोरलं, अशा इन्फ्रामॅनकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? असे संजय राऊत म्हणाले.
ब्रिटिशांच्या काळातले, नेहरुंच्या काळतली धरणं आणि पूल आहेत ते नाही कोसळले. फक्त सहा महिन्यात मिसिंग लिंक तुटते याचा अर्थ त्यात सिमेंट आणि माती नव्हे तर फक्त भ्रष्टाचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई पुणे एक्स्प्रेसवे ड्रीम प्रोजेक्ट होता तो करून घेतला. त्यातही मोठ मोठे बोगदे आहेत, त्यांना कधी गळती नाही लागली, ते कधी तुटले नाहीत. मग तुमची मिसिंग लिंक कशी कोसळते? कारण मिसिंग लिंकमध्ये फक्त भ्रष्टाचार झाला. तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांनी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी पक्षाला निधी कसा ओरबाडता येईल हे पाहिलं. आणि यात काही दलाल जे होते, त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले. आता पैसे खाल्ले अशी टीका केली की त्यांच्यातला हरिश्चंद्र जागा होतो. हे हरिश्चंद्र नसून हरामखोर आहेत म्हणून हा मिसिंग लिंक कोसळला. आम्ही यासाठी मिसिंग लिंकच्या कागदांवर सही नाही केली कारण ते आम्हाला अत्यंत मजबुतीने उभं करायचं होतं. फक्त ठेकेदारांचे धन व्हावे आणि राजकर्त्यांना कमिशन मिळावे म्हणून आम्ही सह्या नाही केल्या, असेही संजय राऊत म्हणाले.
निसर्गाचे चक्र बदलले नाही, तर त्यांच्या मेंदूचे चक्र बदलले आहे. भ्रष्टाचाराचे चक्र बदलले आहे. यांची कमिशनबाजी वाढली आहे. पाऊस काय फक्त मिसिंग लिंकवरच पडला होता का? जगभरात पाऊस पडतोय, जगभरात निसर्गाचा रुद्रावतार पाहिला आहे. पण तुमच्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न पाहिला आहे. पूर्वी लोक कदाचित 10 टक्के खात असतील आता 10 टक्के काम होत आहे आणि 90 टक्के खात आहे, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
वारीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, कोविड काळातही वारी गेली होती. काही कठोर नियम केले होते, पण पंढरपूरला वारी पोहोचली होती. या सरकारला फक्त हिंदुत्वाच्या नावाने मतं मागायला जमतं. किंवा
अशा उत्सवाचे राजकारण करणं आणि वारीचेही निर्माता आम्हीच आहोत, विठोबाही आम्हीच घडवला असेही सांगतील. मला भीती वाटते की, यांच्या ताब्यात विठोबा गेला तर शिवसेनेला त्या दानपेटीचे संरक्षण करावे लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व मंदिरांची आम्हाला काळजी वाटते.
राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणी राजीनामे घेतले यात आश्चर्यकारक असे काय आहे? राम मंदिराची जी लूट झाली आहे, त्याचा हिशोब कोण देणार? 50 रुपये एका गरीबाने चोरले तर त्याला अटक केली जाते. 10 लाखांचा कुठे गैरव्यवहार झाला तर तिथे ईडी घुसते. इथे भाजपच्या लोकांनी आणि भाजपने बनवलेल्या राम मंदिर ट्रस्टने 550 कोटी रुपयांचा अपहार केला आहे. नंतर रामाचे आणि सीतेचे दागिने चोरी झाले. चांदीच्या विटा चोरी झाल्या. राम मंदिर ट्रस्टचा 2 हजार कोटींचा हा घोटाळा झाला आहे. फक्त राजीनाम्याने काय होणार आहे? संपूर्ण ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या ट्रस्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले पाहिजे. हा लोकांचा झालेला विश्वासघात आहे. चोरी झालीच नाही असं सरकार म्हणतंय, मग राजीनामे का घेतले? याचा अर्थ चोरी झाली आहे, चोरांना ट्रस्टच्या वरिष्ठ लोकांनी पकडलेलं आहे. जर पकडले आहे तर पोलिसांकडून त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. पण त्यांना भिती आहे की जनता त्यांना रस्त्यावर फिरू नाही देणार, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


























































