भाजपला ना शहराचं प्रशासन चालवता येत ना देशाचं ना मंदिराचं, सगळीकडे नुसती लूट सुरू आहे; आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

”पहिल्याच पावसात मुंबई व मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईत स्लॅब पडून मरतंय, कुणी मॅनहोलमध्ये पडतंय आणि हे सगळं होऊन ते चाटम हसतायत. किती तो निर्लज्जपणा. किती ती लूट आणि भ्रष्टाचार. भाजपला ना शहराचं प्रशासन चालवता येत ना देशाचं प्रशासन ना एका मंदिराचं प्रशासन”, अशी जोरदार टीका शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

”मला असं वाटतं पहिल्याच पावसात मुंबईचे हाल झालेयत. या सगळ्यासाठी भाजपला एक नवीन टार्गेट मिळाले आहे. प्रशासन प्रशासन प्रशासन. भाजपचे आतापर्यंतचे टार्गेट होते पहिले नेहरू, नंतर ठाकरे व नंतर प्रशासन. अनेक ठिकाणी गेली चार वर्ष नगरविकास मंत्री मिंधे आहेत. अधिवेशनात उत्तरं द्यायची नाही. फक्त पैसे खायचे. भाजपची सत्ता आल्यावर महानगरपालिकेत शहराचे जे हाल झालेयत ते आपण बघितले. पावसाळ्यापूर्वी तयारी काहीच नव्हती. उष्णता वाढत चाललेली. दुष्काळासारखी स्थिती होती. आम्ही जो डिसॅलिएशनचा प्रकल्प सुरू केलेला तो पूर्ण झाला असता तर आता पुण्यात मुंबईत पाण्याचे कट लागू झाला नसता. उन्हाळा गेला. त्यानंतर पाऊस आला तर पावसाची तयारी नाही. ज्या अंधेरीत गेले 12 वर्ष भाजपचे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. तिथला अंधेरी सबवे रिमझिम पावसातही भरू लागला आहे. आम्ही गांधी मार्केट, मिलन सबवे, हिंदमाता पूरमुक्त करून दाखवलं होतं. ते चाटम सगळीकडे शिवीगाळ करतात. वाटेल ते बोलतात. महापौरांचे देखील कामावर लक्ष नाही त्या बांगलादेशींवर लक्ष ठेवून आहेत. मुंबईत कुणी स्लॅब पडून मरतंय, कुणी मॅनहोलमध्ये पडतंय आणि हे सगळं होऊन हे चाटम हसतायत. किती तो निर्लज्जपणा. ही लूट सुरू आहे. भाजपला ना शहराचं प्रशासन चालवता येत ना देशाचं प्रशासन ना एका मंदिराचं प्रशासन. फक्त लूट सुरू आहे. दुसरीकडे हनुमानाचा अपमान. भाजप अध्यक्षांसमोर हनुमानाला नाचवतायत. याहून दुर्दैवी काही नसू शकतं”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

”ही मिसिंग लिंक 2015 साली सुरू झाली होती. ती बघायला हे मिंधेच मला घेऊन गेले होते. तेव्हा मोपलवार आमच्यासोबत होते. हिच मिसिंग लिंक चार वर्षांपेक्षा अधिकने उशीराने तयार झाला. हजारो कोटींनी खर्च वाढलाय. हे सगळं झाल्यावर इंफ्रा मॅन मीच आहे दाखवायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद सुरू असतो. या मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले त्याचवेळी मी सांगितलेले की इथला 50 फूट देखील सपाट रस्ता नाही. त्यानंतर त्यावर खड्डे पडले. काल तर दरड कोसळली सोबत ती कमान आहे त्याचा स्लॅबही कोसळला. राज्यात किती भ्रष्टाचार सुरू आहे त बघा”, असेही ते म्हणाले.

”राम मंदिराच्या घोटाळ्याप्रकरणी अनिल मिश्रा आणि चंपत राय यांचे राजीनामे घेतले आहेत. त्यांचे राजीनामे घेतले याचा अर्थ तिथे घोटाळा झाला आहे हे स्पष्ट होते. देशातील हिंदूंनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी दुसरे जे दोषी आहेत त्यांना आणलं आहे. या सर्वांना विश्वस्त पदी बसवलं भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी बसवलं होतं. राम मंदिरात तुम्ही निर्लज्जपणे घोटाळा करता. आज देशातील लाखो-कोट्यवधी हिंदू जागृत झाले आहेत आणि ते विचारत आहेत की, ज्या राम मंदिरासाठी तुम्ही आम्हाला आंदोलन करायला लावलं, मोर्चे काढायला लावले, रथयात्रा काढल्या, निवडणुका जिंकल्या आणि आमची मतं घेतली, त्याच राम मंदिरात तुम्ही निर्लज्जपणे घोटाळा कसा काय करू शकता? पण या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. हिंदुत्ववादी म्हणून आमच्यातून बाहेर पडले होते. त्या सर्वाना विचारतोय की आहे का तुमच्यात हिंमत विचारायची. ज्या हिंदुत्वासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून आलो त्यासाठी विचारा प्रश्न. मिंधेंमध्ये आहे का हिंमत? असे आदित्य ठाकरे म्हणाले.