
दोन दिवसाच्या पावसाने संपूर्ण राज्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी दरड पडण्याच्या, झाड कोसळ्याच्या घटना घडल्या. अशातच दोन महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे सरकारच्या विकासकामांच्या दर्जावर आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फक्त मोठ्या गोष्टी करतात. पण कोस्टल रोड, अटल सेतू आणि ‘मिसिंग लिंक’ या सर्व प्रकल्पांची दुरवस्था पाहता, जनतेचा पैसा केवळ गुत्तेदारांच्या घशात घालण्याचे काम सुरू असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणाले होते की ताशी 240 किमी वेगाने येणाऱ्या वाऱ्याचाही या मिसिंग लिंकला काही फटका बसणार नाही. मात्र, प्रत्यक्षात ताशी केवळ 90 किमी वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे या मिसिंग लिंकला पूर्णपणे गळती लागली आहे. एवढेच नाही तर त्याच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. 1 मे रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पाची अवघ्या 60 दिवसांत ही दुरवस्था झाली आहे. हीच स्थिती अटल सेतू आणि सागरी मार्गाचीही आहे. सरकार आता यावर गोलमोल उत्तरे देईल, पण हा थेट जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. भ्रष्टाचाराला आणि गुत्तेदारांना पोसणारा हा खेळ महाराष्ट्राचे सरकार खेळतय, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
दोन दिवसांत झालेल्या पावसात झालेल्या मिसिंग लिंकच्या स्थितीने राज्याच्या सरकारचे वाभाडे काढलेले आहेत. सरकारने फक्त शोबाजी करण्याचा प्रघात सुरू केला आहे. केवळ मोठे आणि गोड बोलून शोबाजी करायची, पण प्रत्यक्षात असं काहीच घडत नाही, अशी स्थिती आहे. मोठ्या घराचा पोकळ वासा’ अशी परिस्थिती या सरकारची झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या घोषणेवरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या प्रकल्पासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केल्याचा दावा सरकारने केला असला, तरी अजून 1 इंचही काम पुढे सरकलेले नाही. केवळ निधीचा अंदाज लावणे म्हणजे तरतूद करणे नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा आधी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा लागतो आणि सर्वेक्षण करावे लागते; मात्र या सर्वेक्षणासाठीही अद्याप पुरेसा निधी मिळालेला नाही, असे अंबादास दानवे यावेळी म्हणाले.



























































