
मुंबई आणि आपपासच्या तबेल्यातील म्हशीचे दूध वर्षानुवर्षापासून मुंबईत आणून विकले जाते. आज एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. पण पर्यायी व्यवस्था होईपर्यंत प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून दूध विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील – प्रभू यांनी आज विधानसभेत केली. त्यावर यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
माहितीच्या मुद्द्याद्वारे सुनील प्रभू यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, आज राज्यात अनेक ठिकाणी तबेले आहेत. या तबेल्यातून म्हशीचे दूध शहराकडे पाठवले जाते. पालघर, वसई, दापचरी, आरे कॉलनी या ठिकाणाहून तबेल्यातून दूध आणून मुंबईत विकण्याचा व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यांची संघटनाही आहे. पण अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजपासून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आणली तर कसे विकणार? दूध विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपण हे दूध विकण्याची परवानगी द्या. उद्या तुकाराम मुंढे यांचे पथक तबेल्यात जाईल आणि कारवाई करील. त्यात हजारो कोटी रुपयांचे नुकसान होईल. सरकारने त्यामध्ये लक्ष घालावे. थोडी मुदत द्यावी मग कारवाई करावी, अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.





























































