
अहिल्यानगर महापालिका हद्दीतील सावेडी येथील टी. पी. स्कीम 4 मधील फायनल प्लॉट क्रमांक 43-अ मध्ये अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक ओढा, नाल्याची अधिकृत मोजणी नकाशात नोंद करण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शाकीर शेख यांनी भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, फायनल प्लॉट 43-अ या जागेवर प्रत्यक्षात नैसर्गिक ओढा अस्तित्वात असून, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली आणि पर्यावरणीय निकषांनुसार त्याची अधिकृत नोंद मोजणी नकाशावर असणे आवश्यक होते. मात्र, नगर भूमापन कार्यालयाने तयार केलेल्या नकाशामध्ये या नैसर्गिक प्रवाहाचा उल्लेख नाही. नगररचनाच्या सहायक संचालकांनी 11 जुलै 2025 रोजी नगर भूमापन अधिकाऱ्यांना पत्र देऊन संबंधित नाल्याची नोंद करून सुधारित मोजणी नकाशा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, नगर विकास विभागाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम भूखंड क्रमांक 43-अ संदर्भात मोजणी नकाशा आणि नगररचना योजनेतील क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे नमूद करून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 91 अंतर्गत सुधारणा प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाही 8 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित भूखंडासाठी बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली. तक्रारदाराचा दावा आहे की, वेळेत सुधारित नकाशा उपलब्ध झाला असता तर नैसर्गिक नाल्याच्या दोन्ही बाजूंना नियमांनुसार आवश्यक संरक्षण क्षेत्र व सेटबॅक निश्चित करता आला असता.
तक्रारीनुसार, 30 डिसेंबर 2025 रोजी नगर भूमापन कार्यालयाने पत्रव्यवहार केला, मात्र त्यामध्येही सुधारित नकाशा देण्यात आला नव्हता. त्यानंतर 22 मे 2026 रोजी सहायक संचालक नगररचना यांनी पुन्हा संबंधित बाबीची माहिती मागविली. विशेष म्हणजे, माहिती अधिकार कायद्यांतर्गत 19 जून 2026 रोजी नगर भूमापन कार्यालयाने दिलेल्या उत्तरामध्ये नाल्याची नोंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या पत्रावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे लेखी नमूद करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
बांधकाम मंजुरी प्रक्रियेची जबाबदारी निश्चित करावी
या पार्श्वभूमीवर नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे यांच्या भूमिकेची विभागीय चौकशी करण्यात यावी, नगररचना विभागाच्या वारंवार पत्रांनंतरही सुधारित नकाशा का देण्यात आला नाही याची चौकशी व्हावी, संबंधित बांधकाम मंजुरी प्रक्रियेची जबाबदारी निश्चित करण्यात यावी तसेच भूमी अभिलेख, नगररचना व महसूल विभागाने संयुक्त स्थळ पाहणी करून प्रत्यक्ष नैसर्गिक ओढा/नाल्याची अधिकृत नोंद अभिलेखात करण्यात यावी, अशी मागणी शाकीर शेख यांनी केली आहे.




























































