पोलीस डायरी – ‘मयांक’ उभा चिरला गेला! तरीही रेल्वे प्रशासन सुस्तच!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रभाकर पवार, [email protected]

मयांक रमेश लोहार (२२) हा तरुण अंधेरी (पूर्व), चकाला परिसरातील वेस्टसाईड ब्रँड या कंपनीमध्ये सेल्समनचे काम करीत होता. विरारला राहणाऱ्या मयांकने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी चर्चगेटहून रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटलेली नालासोपारा जलद लोकल अंधेरीला पावणेअकराच्या सुमारास पकडली. तेव्हा पाऊस ‘धो धो’ कोसळत होता. रेल्वे प्रवाशांनी लोकलच्या दारे-खिडक्या बंद केल्या, परंतु फर्स्ट क्लासच्या डब्यात अंधेरीला चढलेल्या रोशन रमेश सुवर्णा (३०) या तरुणाने लोकलचा दरवाजा बंद केला नाही. त्याने दरवाजात मनसोक्त भिजायचे, गार वाऱ्याचा आनंद लुटायचे ठरविले. त्याला सहप्रवाशांनी विरोध केला. अंगावर पाणी पडत असल्याने आमचे कपडे भिजत आहेत असे चढ्या आवाजात बोलून काही प्रवाशांनी लोकलचा दरवाजा बंद केला. तेव्हा रोशन व सहप्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली. चिडलेल्या रोशनने आपल्या बॅगेतील १७ सेंटीमीटर लांब असलेला एक धारदार चाकू बाहेर काढला. मजबूत शरीरयष्टी असलेल्या रोशन सुवर्णाचा आक्रमक पवित्रा पाहून सहप्रवासी घाबरले. वेगवेगळ्या दिशेला विखुरले. तेव्हा फुल टाईट रोशनने मयांकला पकडले आणि त्याच्या छाती व पोटावर चाकूने तीन-चार वार करून त्याचे पोट उभे चिरले. मयांक एका क्षणात रेल्वेच्या फुटबॉलवर रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार मालाड व कांदिवलीच्या दरम्यान घडला. बोरिवली स्टेशन आल्यावर रोशन धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला. मयांकला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याचे निधन झाले. मयांकच्या आई-वडिलांसाठी हा प्रचंड धक्का होता.

मीरा रोड (पूर्व)ला राहणारा व मुंबई विमानतळाच्या कार्गो सेक्शनमध्ये कार्गो ऑपरेटर म्हणून काम करणारा रोशन रमेश सुवर्णा आपल्या कर्नाटकातील गावी पळण्याच्या तयारीत असताना पनवेल येथे पकडला गेला.

सहा महिन्यांपूर्वी एन. एम. कॉलेजचे आलोक कुमार सिंग (३३) यांची बोरिवली लोकलमध्ये मालाड येथे उतरणाऱ्या ओंकार एकनाथ शिंदे (२७) या तरुण कामगाराने सायंकाळी सहाच्या सुमारास धातू पॉलिश करण्याचा अत्यंत टोकदार चिमटा पोटात घुसवून हत्या केली. लोकलमध्ये गर्दी असल्याने चढण्या-उतरण्यावरून वाद झाल्याने ओंकार शिंदेने रागाच्या भरात टोकदार चिमटा आलोक कुमार यांच्या पोटात आरपार घुसवला. जादा रक्तस्राव झाल्याने आलोक कुमार यांचा मृत्यू झाला. ओंकार शिंदे यासही पोलिसांनी अटक केली. मयांक लोहारप्रमाणे आलोक कुमार सिंग हे suddenly provocation चे, आकस्मिक प्रक्षोभाचे बळी पडले.

या सर्व पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी आता संशयित प्रवाशांच्या बॅगा व सामानाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. ही तपासणी पुढे किती काळ चालणार आहे हे लवकरच कळेल. १९९८ साली जयबाला आशर या २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर चर्चगेटकडे निघालेल्या लोकलमध्ये (ग्रँट रोड ते चर्नी रोडदरम्यान) सकाळी ५.४५ च्या दरम्यान एका गर्दुल्याने पैशांसाठी हल्ला केला. तिची पर्स पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध करताच तिला डब्याबाहेर ढकलून दिले. त्या वेळी ती धावत्या गाडीतून खाली पडली आणि तिचे दोन्ही पाय रेल्वेखाली येऊन कापले गेले. ती विकलांग झाली, परंतु तिने अजूनही जगण्याची जिद्द सोडलेली नाही.

कॉलेजला जात असताना बोरिवलीला राहणाऱ्या जयबाला आशरने रेल्वे प्रवासात आपले दोन्ही पाय गमावले, तर डोंबिवलीत राहणाऱ्या २२ वर्षीय मंदा पाटणकर या विवाहित विद्यार्थिनीने आपले प्राण गमावले. २३ सप्टेंबर १९६५ ची दुपारची ही अत्यंत भीषण घटना आहे. मंदा पाटणकर ही चर्चगेट येथील के. सी. कॉलेजमध्ये एम.ए. शिकत होती. कल्याणहून सुटलेल्या व बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) कडे निघालेल्या लोकल मधील फर्स्ट क्लासमध्ये मंदा पाटणकर चढल्या. त्या वेळी सायंकाळचे पावणेचार वाजले होते. मुंबईला लोकल थांबताच तीन तरुण (चोर) पाटणकर यांच्या डब्यात शिरले. पाटणकर एकट्याच डब्यात पुस्तक वाचत बसल्या होत्या. आरोपींनी तिच्यावर थेट चाकूने वार केला आणि गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. पाटणकर यांनी प्रतिकार केला तेव्हा चोरांनी त्यांना जागेवरच ठार मारले आणि गळ्यातील दागिने पळवून नेले. हे सर्व आरोपी पकडले गेले, परंतु मुंब्रा-कळवा रेल्वे स्टेशन आले की, छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकल मधील फर्स्ट क्लासमध्ये प्रवाशांना आजही पांढऱ्या साडीत मंदा पाटणकर दिसतात, किंकाळ्या मारतात असे बोलले जाते.

चर्चगेटहून रोज रात्री सुटणाऱ्या १०.०५ च्या नालासोपारा मधील फर्स्ट क्लासमध्येही विरारच्या मयांक रमेश लोहारची सहप्रवाशांना आर्त किंकाळी ऐकू येते. “मला वाचवा, मला वाचवा” असे तो जीव तोडून बोलत असतो, अशी नालासोपारा लोकलमध्ये अफवा पसरली असून घटनेच्या दिवशी मयांक लोहारच्या जे अवतीभोवती प्रवासी होते, त्या स्वार्थी, आत्मकेंद्रित सहप्रवाशांना आता हुडहुडी भरली आहे. त्यांनी नालासोपारा लोकलला रामराम ठोकला आहे.

१९८० च्या सुमारास पार्ले कॉलेजमध्ये मुलांना शिकविणाऱ्या शांतीदेवी या प्राध्यापक महिलेचीही दिवसाढवळ्या लोकलमध्ये २५ ते ३० वार करून विलेपार्ल्यादरम्यान हत्या करण्यात आली होती. अंगावरील दागिने पळवून नेणाऱ्या आरोपीला मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालीन धाडसी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी दोन वर्षांनी अटक केली. त्या वेळी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांनी मधुकर झेंडे व त्यांच्या पथकाला दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मुंबई रेल्वे पोलिसांची हद्द चर्चगेटपासून पालघर, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून ते कसाऱ्यापर्यंत आहे. रेल्वे प्रवास करताना रोज सरासरी आठ ते दहा प्रवाशांचा रेल्वे रुळाखाली येऊन किंवा पडून बळी जातो. या मृतांमध्ये एका तरी प्रवासी महिलेचा समावेश असतो. म्हणजे महिला कुठेच सुरक्षित नाहीत. कधी, कुठे कोण चाकू-सुरे काढील, गोळीबार करील, बॉम्बस्फोट घडवील हे खात्रीने सांगता येणार नाही. रोज प्रवास करणाऱ्या कुणालाच आपण वेळेवर व सुरक्षित घरी पोहोचू अशी खात्री आज वाटत नाही. रेल्वे प्रवाशांनो, घरी आपले कुटुंबीय वाट बघत आहेत. रोशन सुवर्णासारख्या माथेफिरूपासून तुमच्या जिवाला धोका आहे. तेव्हा सावधान! रेल्वेचे डबे आता हैवानांचे अड्डे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वाराणसीहून देवदर्शन करून नागपूरला परतणाऱ्या काही महिलांच्या धावत्या ट्रेनमध्ये खुलेआम लाईट बंद करून विनयभंग करण्यात आला तरी रेल्वे पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. याला काय म्हणावे?

आपला सुंदर, प्रेमळ, सुहृद मुलगा मयांक गणपती बाप्पाला समर्पित केलेल्या मंगळवारी सुरक्षित घरी पोहोचेल असे त्याच्या आई-वडिलांना वाटले होते, परंतु त्यांना २३ जून रोजी प्रचंड हादरा बसला. धरणीकंप झाला. मयांकने रेल्वे प्रवासातच शेवटचा श्वास घेतला. अशा या पालकांच्या हातातोंडाशी आलेल्या तरुण मुलाचा “मला वाचवा” हा काळीज चिरणारा आवाज ऐकून रेल्वे प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकत आहेत. रेल्वे डब्यात रोशन रमेश सुवर्णासारखे दारुडे कधी हैदोस घालतील हे सांगता येणार नाही. रेल्वे मार्गांना कुंपण किंवा भक्कम सीमा नसल्याने आज कुणीही रेल्वेत प्रवेश करतो, गुन्हा करतो आणि पळून जातो. रेल्वे प्रशासनाला याची कोणतीच खंत वाटत नाही. रेल्वे म्हणजे एक निद्रिस्त अजगरच म्हणावा लागेल. त्यांना माणसाच्या जिवाचे मोल नाही.