हिमाचलमध्ये ढगफुटीचा कहर, 13 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कता राखण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे गरसा मध्ये अचानक पूर आला. या पुराच्या तडाख्यात काही पूल वाहून गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, प्रशासनाने नदी-नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरसा शिलानाला परिसरातील उंच डोंगराळ भागात ढगफुटी झाल्यानंतर गरसा दरीतील पाण्याची पातळी काही मिनिटांतच धोकादायकरीत्या वाढली.

 

दरम्यान, हिमाचल प्रदेशात मान्सूनचा जोर कायम असून राज्य हवामान विभागाने १३ जुलैपर्यंत अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे अचानक पूर, भूस्खलन आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा तसेच नदी, ओढे आणि नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे वृत्त आज तक ने दिले आहे.

 

राज्यातील कांगडा जिल्ह्यातील गुलेर येथे सर्वाधिक 45.6 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय सराहन, सुंदरनगर, नादौन, सुजानपूर तिरा, नाहन, काहू, भाबनगर आणि शिमला येथेही लक्षणीय पाऊस झाला. शिमला, जुब्बरहट्टी, भुंतर, मुरारी देवी आणि सुंदरनगर परिसरात मेघगर्जनेसह पावसाची नोंद झाली.

 

मुसळधार पावसामुळे बाधित रस्ते तातडीने सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात 11 हजार 137 बेलदार, 4 हजार 228 बहुउद्देशीय कामगार आणि 1 हजार 156 अवजड यंत्रसामग्री तैनात केली आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीसाठी सहा बेली ब्रिज तयार ठेवण्यात आले असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त यंत्रसामग्री उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

1 ते 7 जुलै या कालावधीत हिमाचल प्रदेशात 43.4 मिमीच्या सरासरीच्या तुलनेत 54.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक आहे. किन्नौर जिल्ह्यात सर्वाधिक 161 टक्के अधिक पाऊस झाला, तर लाहौल-स्पितीमध्ये 40 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, भूस्खलनप्रवण आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.