
तो आला, खेळला पण हताश झाला. कारण ‘करो या मरो’ सामन्यात त्याला एकही गोल करता आला नाही. ‘गोलसम्राट’ अशी बिरुदावली तो मिरवत असला तरी स्पेनविरुद्धच्या सामन्यात तो एकाकी पडल्याचे सर्वांनीच पाहिले. संघातील एकही खेळाडू त्याला साथ देत नव्हता. त्यामुळेच पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो निराशेच्या गर्तेत अडकल्याचे दिसत आहे. कारण या नैराश्यामधून तो असं काही बरळून गेला की, त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. कारण रोनाल्डोने फिफा वर्ल्ड कपची तुलना युरोपियन
चॅम्पियनशिपबरोबर त्याने केली आहे.
रोनाल्डो नेमकं काय म्हणाला..
पराभवानंतर रोनाल्डो आपले अश्रू लपवू शकला नाही. सामना संपल्यावर तो म्हणाला की, ‘फिफा विश्वचषक न जिंकल्याबद्दल मला दुःख आहे, पण कोणतीही खंत नाही. मी पोर्तुगालसाठी तीन विजेतेपदे जिंकली आहेत. राष्ट्रीय संघाचे सर्वात मोठे विजेतेपद 2016 युरोपियन चॅम्पियनशिप आहे. खरे सांगायचे तर, माझ्यासाठी विश्वचषक जिंकण्याइतकेच महत्त्वाचे आहे.’ रोनाल्डोच्या आगमनापूर्वी पोर्तुगालने कोणतेही विजेतेपद जिंकले नव्हते. पण रोनाल्डोला वर्ल्ड कप मात्र जिंकता आला नाही, हे कटू सत्य आहे.
माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण…
स्पेनविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी रोनाल्डो म्हणाला होता की, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल. हा सामना संपल्यावर रोनाल्डो म्हणाला की, ‘वर्ल्ड कपमधून अशा प्रकारे बाहेर पडल्याने मला खूप दुःख झाले आहे. मी माझे सर्वस्व दिले आणि सर्वोत्तम प्रयत्न केला. मी पूर्ण समाधानी मनाने वर्ल्ड कपमधून बाहेर पडत आहे. हो, माझा हा शेवटचा विश्वचषक होता, पण आता मला माझ्या कामगिरीवर विचार करण्याची आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मी कोणताही निर्णय आता विचारपूर्वकच घेणार आहे, त्यामध्ये कोणताही आततायीपणा नसेल.’




























































