Chhatrapati sambhaji nagar news – कायदा गेला चुलीत! आयुक्तालयाच्या हद्दीत आठवड्याला एक खून!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

>> देविदास त्र्यंबके

मंगळसूत्र चोऱ्या, वाहन चोऱ्या, दिवसाढवळ्या लुटमार, बलात्कार, अत्याचार हे तर नित्याचेच आहे. कायद्याचा धाक म्हणून राहिला नाही. शहरात आता माणसाचा जीवही स्वस्त झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आठवड्याला एक खून पडत आहे! सहा महिन्यात २४ जणांची निघृण हत्या झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चार खून पडले.

पोलिसांची संख्याही वाढली. परंतु गुन्हेगारीला आळा काही बसला नाही. उलट दिवसागणिक गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. शहरात सध्या महिन्याला चार खून आणि सात प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत आहेत. पोलिसांच्याच अधिकृत नोंदीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुन्हेगारीचा आलेख चढउताराचा

छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हेगारीचा पाच वर्षातील आलेख चढउताराचा राहिला आहे. पोलीस अधिकारी कार्यक्षम आला की हा आलेख उतरला… ढिम्म काळजाचा पोलीस अधिकारी आला की हा आलेख चढता राहिला. २०२१ मध्ये ३५ खून झाले. २०२२ मध्ये हेच प्रमाण वाढून ४३ वर गेले. २०२४ मध्ये ४६ जणांची हत्या झाली. २०२५ मध्ये आलेख खाली उतरला. यावर्षी २८ खून झाले. २०२६ च्या सहा महिन्यातच २४ खून पडले आहेत. त्यापैकी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार जणांचा खून झाला. प्राणघातक हल्ल्याच्या ४५ घटना घडल्या.

वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक खून

शहरातील चिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसरातील औद्योगिक वसाहतीला अवकळा आली आणि वाळूज औद्योगिक वसाहतीचा विकास होत गेला. मोठमोठे कारखाने आले. त्यामुळे भरभराट झाली, पण सोबत गुन्हेगारी घेऊन आली. वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक सहा खून झाले. सिडको, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी तीन, तर वेदांतनगर, छावणी, वाळूज, दौलताबाद, हर्मूल, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक खून झाला. एमआयडीसी सिडको, जिन्सी ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन खून पडले. जवाहरनगर, सिटीचौक, बेगमपुरा आणि क्रांतीचौक ठाण्याच्या हद्दीत एकाही खुनाची नोंद झाली नाही.

शहरातील गुन्हेगारी घटनांचा अभ्यास करत आहोत. या खुनांमागील कारणांचा शोध घेऊन गुन्हे कमी करण्यासाठी धोरण ठरवण्यावर भर देऊ. त्यानुसार नियोजन करून गुन्हे वाढणार नाहीत, याची दक्षता घेऊ.

शशिकांत सातव, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त

सहा महिन्यांत २४ जणांची हत्या

शहराच्या औद्योगीकरणाने वेग घेतला. ‘आशिया खंडातील झपाट्याने वाढणारे शहर’ म्हणून छत्रपती संभाजीनगरचा जगभरात नावलौकिक वाढला. पोट भरण्यासाठी म्हणून मराठवाड्यातील लोकांचा छत्रपती संभाजीनगरात येण्याचा कल वाढला. नागरीकरण वाढले, तसे शहरात गुन्हेगारीही फोफावली. शहराचा विस्तार झाला, पोलीस ठाण्यांची संख्याही १७ झाली.