परभणीत कामाच्या ताणामुळे बीएलओचा हृदयविकाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीएलओच्या कामाचा ताण आल्यामुळे हृदयविकाराच्या धक्क्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली. वयाच्या ५४ व्या वर्षी आपल्याला हे काम झेपत नसल्याची तक्रार संबंधित शिक्षकाने केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परभणी शहरात गंगाखेड रोडवर शांतिनिकेतन शाळेत रवि शिवलिंग स्वामी हे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाअंतर्गत बीएलओची जबाबदारी सोपवण्यात आली होती. वयोमानानुसार आपल्याला हे काम झेपणार नाही, अशी कल्पना त्यांनी वरिष्ठांना दिली होती. मात्र तरीही त्यांना हे काम करण्यास सांगण्यात आले.

शाळा करून एसआयआरचे काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. मतदार यादीच्या कामावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वामी यांचा प्रचंड पाणउतारा केला. याच ताणतणावात मंगळवारी सकाळी ६ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. केरवाडी, ता. पालम येथील रहिवासी असणारे रवि स्वामी हे अतिशय मनमिळावू आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात. धार्मिक आणि सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते.

शिक्षकांना सध्या विविध शाळाबाह्य कामांना जुंपण्यात आले आहे. जनगणनेचे काम संपते न संपते तोच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे काम लागले. ‘एसआयआर’चे काम चालूच आहे. ‘टीईटी’च्या परीक्षेचा वेगळाच ताण आहे. रवि स्वामी यांचा शासनव्यवस्थेने बळी घेतल्याचा आरोप शिक्षणमहर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सहसचिव नवनाथ जाधव यांनी केला.