
सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वेळेत न केल्याच्या संदर्भातील मुद्दा आज विधानसभेत चर्चेला आला. त्यावर सरकारी आश्वासनांबाबत या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज संपण्यापूर्वी सभागृहात श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले. १७ डिसेंबर २०२५ रोजीच्या तारांकीत प्रश्नावरील पूरक माहिती आज सादर करण्यात आली. त्यावर, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वीही विलंबाने होणाऱ्या आश्वासनपूर्तीचा मुद्दा आला होता. तेव्हा स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण आमदार असताना मांडलेल्या कपात सूचनेचे उत्तर मुख्यमंत्री झाल्यावर मिळाल्याची आठवण सांगितली होती. २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या कपात सूचनेचे उत्तर मागच्या आठवड्यात आल्याचे सांगून विधानसभेला इतके स्वस्त समजू नका, अशी खंत मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.





























































