
नाशिक घाटमाथ्यावर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने पुन्हा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली असून, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग झपाट्याने वाढविण्यात आला आहे. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत धरणातील विसर्ग तब्बल १८,४०३ क्युसेकवरून ५३,२२३ क्युसेक इतका वाढल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी १ वाजता धरणातून १८,४०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर दुपारी २ वाजता तो २८,९३४ क्युसेक, दुपारी ३ वाजता ४०,१२३ क्युसेक, तर दुपारी ४ वाजता थेट ५३,२२३ क्युसेक इतका वाढला. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी गोदावरी नदीलगतच्या गावांतील नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्र, घाट, बंधारे तसेच पूरप्रवण भागात अनावश्यक वावर टाळावा, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन व ग्रामपंचायत यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता कोणतीही अफवा न पसरविता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गोदावरीच्या वाढत्या प्रवाहामुळे नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि सतर्क राहणे, हीच सध्या काळाची गरज बनली आहे.





























































